प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी :
इचलकरंजी शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्यावतीने शिवतीर्थ परिसरात देव दीपावली उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात दिमाखात साजरा करण्यात आला. या दीपोत्सवामुळे शिवतीर्थ परिसर उजळून निघाला होता.
इचलकरंजी शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती ,छत्रपती संभाजी महाराज जयंती ,गड - किल्ले मोहिम ,किल्यांचे संवर्धन ,दुर्गा दौड यासह वर्षभरात विविध कार्यक्रम घेतले जातात. नुकताच या संघटनेच्या वतीने शिवतीर्थ परिसरात दिवे लावून देव दीपावली उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात दिमाखात साजरा करण्यात आला.
प्रारंभी गुरुवर्य गजानन महाजन व शिवतीर्थ सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रेरणा मंत्र, ध्येयमंत्राने सांगता करण्यात आली. यावेळी शिक्षण सभापती मनोज साळुंखे, नगरसेवक रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंदू धर्मात दर्श अमावस्येचा दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ होतो. या दिवसाला देव दिपावली म्हणतात. पुराण शास्त्रानुसार या दिवशी देव देवतांची दिपावली असते. याच धर्तीवर दरवर्षी शहरातील शिवतीर्थ येथे शिवप्रतिष्ठानहिंदुस्थान संघटनेच्यावतीने देव दिपावली उत्सव साजरा केला जातो. यंदा शिवतीर्थ सुशोभीकरणानंतरची ही पहिलीच देवदिपावली असल्याने धारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात व दिमाखात दीपोत्सव साजरा केला. या निमित्ताने शिवतीर्थ परिसर विविध रंगांच्या रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. तर तेल वातीच्या दिव्यांनी शिवतीर्थ परिसर उजळून गेला होता. तसेच विद्युत रोषणाई आणि आतषबाजीने परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.
या वेळी आनंदा सूर्यवंशी, गणेश सुतार, प्रसाद जाधव, नागेश पाटील, मंगेश मस्कर, शिवप्रतिष्ठानचे विभाग प्रमुख, धारकरी व शिवभक्त मोठ्या संख्येने हजर होते.