प्रबोधिनीच्या चर्चा सत्रातील मत..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता.१९, सहकाराच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेतील लोकशाही पासून समाजवादा पर्यंतची आणि संघराज्य एकात्मतेपासून धर्मनिरपेक्षतेपर्यंतची सर्व मूल्ये रुजविता येतात. त्यातून समाज विकासाचा समृद्ध मार्ग तयार होऊ शकतो. सहकार हे परिसराचा विकास करण्याचे बेट होऊ शकते आणि त्यातून राष्ट्र उभारणीला सर्वांगीण चालना मिळू शकते हे डॉ. अप्पासाहेब उर्फ सा. रे .पाटील यांनी आपल्या कृतीकार्यातून दाखवून दिले, असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे .पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ' सारे,सहकार आणि समाजवाद ' या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांच्या हस्ते डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या चर्चासत्राच्या विषयाची मुख्य मांडणी प्रसाद कुलकर्णी यांनी केली.त्यातून त्यांनी सा.रे.पाटील यांच्या जीवन कार्याचा विस्तृत आढावा घेतला.आणि त्याचे समकालीन महत्व अधोरेखित केले.
मुख्य मांडणी नंतर झालेल्या चर्चेत डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील यांच्या व्यक्तिगत आठवणी, त्यांचे सहकार ,सामाजिक, राजकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान , महाराष्ट्राची सहकार चळवळ,पंडित नेहरूंनी स्वीकारलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेतील सहकाराचे महत्व, यशवंतराव चव्हाण यांचा सहकार विषयक दृष्टिकोन ,कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ अशा विविध मुद्यांवर अनेकांनी प्रकाश टाकला.या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, प्रा.रमेश लवटे,पांडुरंग पिसे,तुकाराम अपराध, अशोक केसरकर,दयानंद लिपारे,सचिन पाटोळे,मनोहर जोशी,नारायण लोटके,महालिंग कोळेकर,शकील मुल्ला,शहाजी घस्ते,अशोक माने,आनंद जाधव आदींनी सहभाग घेतला.