शिवराणा संस्थेच्या किल्ला बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात



प्रेस मीडिया वृत्तसेवा ,:

इचलकरंजी  / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील शिवराणा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य किल्ला बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम योग भवन मध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अँड.अनिल डाळ्या , किल्ला स्पर्धेचे परीक्षक अरविंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आजच्या टिव्ही केबल व मोबाईलच्या जमान्यात नव्या पिढीचे वाचन कमी होवून त्यांना खरा इतिहास समजण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शिवकालीन इतिहास समजून घेवून त्यातून प्रेरणा मिळावी ,या उद्देशाने दरवर्षी इचलकरंजीत शिवराणा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून बाल - गोपालांसाठी किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षीही त्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले अरविंद कुलकर्णी व अन्य सहका-यांनी परिक्षण करुन काही किल्ले विजेते म्हणून घोषित केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना नुकताच योग भवनमध्ये बक्षिस वितरण कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी प्रास्ताविक सचिन भुतडा यांनी केले.तर संस्थेचे अध्यक्ष राजतिलक लाहोटी यांनी संस्थेने आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला.

 या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी शिवराणा संचलित गो - शाळेच्या कार्याचा व अविरतपणे सुरू असलेल्या गोसेवेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार काढले. दरम्यान ,किल्ला बांधणी स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, जगातील सर्वोत्तम राजा कादंबरी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर या किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये पदमदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारलेल्या केसरी चौक कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या मंडळांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता ध्येय मंत्र घेऊन करण्यात आली.

 यावेळी शिवराणा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव रोहन हेरलगे, कोषाध्यक्ष शुभम खटोड, सदस्य सचिन भुतडा, कपिल दरक, शिवदयाल पलोड, राहुल शेळके, विजय चव्हाण, आशिष शर्मा, अंकित बजाज, संतोष बजाज, निकेश मुंदडा, निलेश शेळके आदी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post