साऱ्यांनाच आपले वाटणारे सा.रे.पाटील

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

 ( ९८ ५०८ ३० २९० )


स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये ज्या नेतेमंडळींनी सहकारातून समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांना रुजविण्याचा प्रयत्न केला किंबहूना त्यासाठी आयुष्य वेचले त्यामध्ये डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ११ डिसेंबर १९२१ रोजी जन्मलेले सा.रे.पाटील वयाच्या चौऱ्यांणव्या  वर्षी १ एप्रिल २०१५ रोजी कालवश झाले. सातगोंडा रेवगोंडा पाटील हे त्यांचे पूर्ण नाव.मात्र ते आप्पासाहेब उर्फ सारे या नावानेच ओळखले गेले. त्यांच्या नावातच सारे ' जन ' सामावून घेण्याची शक्ती होते.एक अतिशय आदर्श लोकप्रतिनिधी आणि आम जनतेला आपला वाटणारा एक खराखुरा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे.भारत स्वतंत्र होताना जी पिढी पंचविशीत होती त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.सारे पाटील त्या पिढीचे एक कृतीशील प्रतिनिधी होते.सारेंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका ही सारेंची कर्मभूमी. शिरोळ तालुक्याच्या सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक, सहकारी अशा सर्व क्षेत्राचा केंद्रबिंदू  म्हणून आप्पासाहेब सारे पाटील साडेसहा - सात दशके कार्यरत होते. शिरोळ तालुक्यातील जांभळी या गावी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सातवीपर्यंत शिक्षण घेत यांनी वडीलांना शेतीत मदत केली.वडिलांकडून स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हा वारसाहक्काने मिळालेला गुण आप्पासाहेबांनी जन्मभर जपला. शेतीबरोबरच उपजीविकेचे साधन म्हणून नोकरी करणे आवश्यक होते.त्यामुळे आप्पासाहेबांनी इचलकरंजी नगरपालिकेत आणि त्यानंतर काही वर्षे शिरोळ तालुका खरेदी विक्री संघामध्ये नोकरी केली. हा नोकरीच्या कालखंड त्यांनी माणसे जोडण्यासाठी आणि समाज समजून घेण्यासाठी करून घेतला. शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गाव त्यांनी सायकलवरून पिंजून काढले. त्यांच्या विनम्र,बोलक्या, मदतकारी ,स्पष्ट ,दूरदर्शी व धडपड्या स्वभावाने त्यांनी सर्वाना आपलेसे केले. त्या काळात एकीकडे देशाचा स्वातंत्र्यलढा आकाराला येत होता. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याला कुठल्या दिशेने न्यायचे याची चर्चाही सुरु झाली होती.आप्पासाहेब या सर्व चळवळीत सहभागी होते. याच काळात आप्पासाहेबांचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला. महात्मा गांधी यांच्या विचारांनीही ते भारले गेले.पंडित नेहरूंच्या समाजवादी विचारांच्या  दृष्टीकोनाकडेही ते वळले.

राष्ट्रसेवा दलाशी संबंध आल्याने साने गुरुजी, मधु दंडवते, जयप्रकाश नारायण,एस. एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे, मोहन धारिया ,सदानंद वर्दे,श्यामराव पटवर्धन, प्रभुभाई संघवी,माधवराव बगल आदी अनेकांशी त्यांचा परिचय झाला. आपल्या हातून घडलेल्या चांगल्या कामाची नाळ सेवादलाच्या विचारधनात आहे असे ते नेहमी म्हणत असत. पण तरुण वयापासूनच सेवादलाच्या चर्चा,गाणी,अभ्यास शिबिरे यात केवळ गुंतून पडले नाहीत.तर त्याही पलीकडे जाण्याचा त्यांनी कृतिशील प्रयत्न केला हे त्यांचे वैशिष्ट्य होते.त्यांच्या याच कृतीशील कार्यामुळे साधना साप्ताहिकापासून एकूणच समाजवादी चळवळ स्थिरावली,बळकट झाली यात शंका नाही. सारे पाटील म्हणाले होते,"  भोवतालच्या लोकांसाठी विधायक काम करण्यात मला अधिक रस होता. माझा पिंड राजकीय नसला तरी राजकीय अंग मला होतं. राजकीय सत्तेशिवाय समाजाच  परिवर्तन होत नाही असही मला बऱ्याच वेळेस वाटलं.तसा अनुभवही घेतला होता. सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टींच महत्त्व मी जाणून होतो. सत्तेच्या राजकारणात पराभव स्वीकारून काम करत राहण्याला पर्याय नसतो.पण विधायक कामात मला नेहमीच अधिक रस होता." 

याच भूमिकेतून सारे पाटील यांनी स्वातंत्र्यापूर्वीच १९४६ साली जांभळीविकास संस्थेची स्थापना केली. आणि त्यातून सहकारातुन समाजवादाचे स्वप्न साकारण्याची मुहूर्तमेढ रोवली. असे संस्थात्मक काम करत असतानाच देश स्वतंत्र झाला. संविधानाची निर्मिती झाली.पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशाने दहा वर्षाची वाटचाल केली होती.याच काळात संयुक्त महाराष्ट्राचा लढा जोरात होता. वयाच्या छत्तीसाव्या वर्षी सारे पाटील यांना संयुक्त महाराष्ट्र समितीने विधानसभेची उमेदवारी दिली.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली.' एक मत द्या आणि एक रुपया द्या 'असे आवाहन करत सारेंनी विजयश्री खेचून आणली. ते विधानसभेचे आमदार झाले. त्याच्या विधायक दृष्टिकोनाला एक प्रकारे मिळालेली ती लोकमान्यता होती.

पुढे १९६२ व १९६७ साली त्यांना विधानसभेला पराभव पचवावा लागला. पण हे पराभव त्यांच्या विधायक, संस्थात्मक कामात अडथळा ठरले नाहीत. जांभळी मध्ये त्यांनी सहकारी तत्त्वावर लिफ्ट इरिगेशन प्रकल्प उभारला.त्याद्वारे शेतीच्या बारमाही पाण्याची व्यवस्था केली. शिरोळ तालुका दुध संघाची स्थापना केली.सहकाराच्या माध्यमातून पोल्ट्री फार्मही काढला.' इंद्रधनुष्य'नावाचे दैनिकही सुरू केले. ( काही कारणांनी बंद पडलेले हे दैनिक पाच वर्षांपूर्वी मासिक रुपात 'इंद्रधनुष्य ' याच नावाने मा.गणपतराव दादांनी सुरू केले ही आनंदाची व अभिमान नाची बाब आहे.).भूविकास बँक आणि जिल्हा बँकेतही सारेंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पण एके ठिकाणी म्हटलं आहे ,' सतत प्रयोग करण्याच्या वृत्तीने मी नवनवीन अनुभव घेत राहिलो. काही प्रयोग चांगल्या लोकांच्या सहकार्याने पुढे गेले. काही पुढे नेता आले नाहीत. पण मी प्रयोग करणं थांबवलं नाही.छोट्या-मोठ्या संस्था काढणे आणि समाजाच्या हिताचे काम करत राहण हे माझ्या आयुष्याचं प्रमुख अंग बनून गेल."

१९६९ साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा यांच्याकडून सहकारी साखर कारखाना काढण्याची परवानगी मिळवली.१९७१ "साली दररोज बाराशे पन्नास मेट्रिक टन उसाचे गाळप करणारा हा कारखाना सुरू झाला. माजी खासदार कालवश दत्ताजीराव कदम हे त्याचे संस्थापक चेअरमन तर सारे पाटील संस्थापक व्हाइस चेअरमन झाले. या साखर कारखान्याचे हे पन्नासावे  वर्ष आहे.गेले अर्धशतक शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे केंद्रबिंदू म्हणून हा साखर कारखाना कार्यरत आहे.तसेच समाजवादी चवळीच्या भक्कम आधारस्तंभ ही  त्याची ओळख आहे.सारे पाटील यांचे व्यक्तिमत्वात स्वच्छता, नीटनेटकेपणा याबरोबरच साहित्य,कला, क्रीडा या साऱ्या गुणांचा परिपोष होता. त्याचे दर्शन या कारखान्याच्या अंतर्बाह्य रूपाच्या टवटवीतपणातुन अधोरेखित होते.कालवश यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता,विठ्ठलराव विखे पाटील,तात्यासाहेब कोरे अशा अनेकांच्या मदतीने त्यांनी लोकसेवेच्या कामाचा डोंगर उभा केला. अवघ्या सातवीपर्यंतचे शिक्षण झालेल्या सारे पाटलांचे जगभरातील अद्यावततेकडे बारकाईने लक्ष होते.याचे कारण त्यांच्या समाज विकासाच्या ध्यासात होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने या कर्मयोग्याला ' डि.लीट ' या सन्माननीय पदवीने गौरविले. तसेच इतरही अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. त्यांच्या विधायक कामाला  मिळालेली ही पोचपावती होती.

दत्त कारखान्याच्या परिसरात त्यांनी उभे केलेले दत्त भांडार, सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल निर्मिती प्रकल्प ,कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, झुणका भाकर केंद्र सुसज्ज असे आरोग्य केंद्र ,औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ,इंजिनीरिंग कॉलेज असे अनेक उपक्रम राज्यभर लौकिक प्राप्त ठरले आहेत.तसेच हा कारखाना समाजवादी चळवळीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे आरोग्यकेंद्र ,निवारा केंद्र,उर्जाकेंद्र ठरला आहे. 

हे विधायक काम करत असतानाच सारेंनी १९९० साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला.तत्पूर्वीच्या निवडणुका त्यांनी अपक्ष म्हणूनच लढवल्या होत्या. १९५७ साली आमदार झाल्यानंतर त्यांना दोन विधानसभेच्या आणि एक लोकसभेच्या निवडणूकित पराभव पत्करावा लागला होता. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर १९९९मध्ये ते विधानसभेत पुन्हा निवडून आले. २००४ साली त्यांनी निवडणूक लढवली नाही. मात्र २००९ साली वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, विलासराव देशमुख, पतंगराव कदम,बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण आदी अनेक बड्या नेत्यांशी त्यांची जवळीक होती. त्यांच्या माध्यमातून त्यांनी परिसराचा विकास केला.त्यांचे प्रशासनातील अधिकाऱ्यांशी अत्यंत जवळिकीचे ऋणानुबंध होते. कारण सारे पाटील कधीही व्यक्तिगत कामासाठी नव्हे तर सामाजिक कामासाठी पाठपुरावा करतात हे अधिकारीही जाणून होते. त्यामुळे प्रशासनावर  सारे पाटील यांचा एक आदरयुक्त नैतिक धाक होता.

सारे पाटील या अफलातून व्यक्तिमत्वाशी मी तीस वर्षे जवळून परिचित होतो याचा मला नेहमीच अभिमान वाटतो.समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस कालवश आचार्य शांताराम गरुड यांनी १९८५ साली मी प्रबोधिनीच्या कामात आलो त्यावेळी सारे पाटलांशी ओळख करून दिली होती. ती अखेरपर्यंत वाढत्या स्नेहाची राहिली. समाजवादी प्रबोधिनीच्या कामाबद्दल त्याला प्रचंड आस्था होती ते अनेकदा संस्थेत येत असत.त्यांनी प्रबोधिनीच्या कामाला नेहमी सहकार्य केले. तोच विचार वसा,वारसा ,ऋणानुबंध आज त्यांचे चिरंजीव गणपतरावदादा पाटील जपत आहेत. गणपतरावदादांनी सारेंच्या जन्मशताब्दीनिमित्तच्या काही उपक्रमात मला आवर्जून जोडून घेतले याचा मनस्वी आनंद आहे. विधायक विचारांची जी दिशा सारेंनी जपली ती त्या दिशेने पुढे जाणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.हीच सारेंना खरी आदरांजली ठरेल.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली बत्तीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post