प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
गुरुवार ता. ०२ डिसेंबर २०२१ रोजी संत ज्ञानेश्वरांचा ७२५ वा समाधी सोहळा दिन आहे. १२७५ साली जन्मलेल्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीत इंद्रायणीच्या काठी १२९६ साली ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती.”संतकृपा झाली | इमारत फळा आली !!’ज्ञानदेवे रचिला पाया! उभारले देवालया !! नामा त्याचा किंकर ! तेणे केला हा विस्तार !! जनार्दन एकनाथ ! ध्वज उभारला भागवत !! भजन करा सावकाश !तुका झालासे कळस !! बहिणी म्हणे फडकती ध्वजा ! निरूपण केले वोजा !! “ही मराठी संत वाङ्मयाची सर्वमान्य परंपरा आहे.वारकरी संप्रदायाची स्थापना जरी भक्त पुंडलिकांनी केली असली तरी या संप्रदायाला वैचारिक अधिष्ठान मिळवून देण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले.गळ्यामध्ये तुळशीमाळा घालून,खांद्यावर भगवी पताका घेऊन जो नियमितपणे एकादशीला पंढरीची वारी करतो तो वारकरी.या वारकऱ्यांचा जो संप्रदाय तो वारकरी संप्रदाय.या संप्रदायाचा वैचारिक पाया ज्ञानेश्वरांनीं घातला.नामदेव,एकनाथांनी त्यावर इमारत उभी केली.आणि तुकारामांनी त्यावर कळस चढवला.अशी वारकरी संप्रदायाच्या मूळ घराची मांडणी आहे.
ज्ञानेश्वर कालीन महाराष्ट्र तसा सुखी व समाधानी होता.एका अर्थाने हा काळ महाराष्ट्राच्या ऐश्वर्य संपन्नतेचा काळ होता.ज्ञानेश्वरांचा जन्म झाला तेंव्हा म्हणजे इसवीसन १२७५ मध्ये महाराष्ट्रात यादव वंशाचे राज्य होते.राजा रामदेवराय राज्य करत होते.ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात त्याचा उल्लेखही आढळतो.अतिशय धर्मनिष्ठ असलेल्या राजा रामदेवराय यांच्या उत्तरकाळात महाराष्ट्र पारतंत्र्यात लोटला गेला.अर्थात ज्ञानेश्वरी लिहिली गेली त्यावेळी महाराष्ट्र स्वतंत्रच होता.
त्या काळात बौद्ध धम्माचे तेज मंदावले होते.वैदिक परंपराही प्रबळ राहिली नव्हती.तसेच याचवेळी जैन,लिंगायत व महानुभाव या तिन्हीच्या रूढी परंपरा महाराष्ट्रात एका अर्थाने कार्यमुक्त झाल्या होत्या.सर्वसामान्य लोक निरनिराळ्या गोष्टीत,विषयात गुंतत चालले होते.देव देवता यांचे संख्यात्मक व अंधश्रद्धात्मक अवडंबर माजले होते.समाजात देव देव करत देवाच्या मागे लागणाऱ्यांची संख्या वाढत चालली होती.एकूण काय तर समाजात वास्तवापासून पळ काढणाऱ्यांची संख्या वाढत चालली होती.सक्रियते ऐवजी निष्क्रियता वाढत होती. ‘असेल हरी,तर देईल खाटल्यावरी ‘हा भ्रम वाढत होता.भुते- खेते,नवससायास,जादू-टोणा,मंत्र -तंत्र,गंडा- दोरा,व्रत -वैकल्ये अशाअनिष्ट गोष्टीच्या चक्रात बहुसंख्य लोक भरडून निघत होते.त्यामुळे खऱ्याखुऱ्या धर्मतत्वाचा लोप होऊन वैचारिक व सामाजिक गोंधळाचे वातावरण फोफावले होते.परिणामी अनिष्ट रूढी परंपरा,अंधश्रद्धा यांचे संगोपन व संवर्धन वेगाने होत होते.
बदलत्या काळानुसार स्वतःला न बदलता जुन्या रूढी परंपरांना चिकटून बसण्याच्या स्थितीवादी विकृतीमुळे आणि मूळ धर्मविचारापेक्षा कर्मकांडाचेच प्रस्थ वाढल्यामुळे वैदिक धर्माला सार्वजनिक प्रतिष्ठा न मिळता तो विशिष्ठ वर्गाचीच मिरासदारी बनला.या मिरासदारीची झळ खुद्द ज्ञानेश्वरांनाही बसली.अर्थात त्यांचे आई- वडील- भावंडे या साऱ्यांनाच ती झळ सोसावी लागली.ब्राम्हण जातीचे असूनही या सर्व भावंडाना ‘संन्याशाची मुले ‘म्हणून हिणवले गेले.बहिष्कृत केले.या छळानेच ज्ञानेश्वर अंतर्मुख झाले.
मी ब्राम्हण जातीत जन्मलो तरी माझा व भावंडांचा एवढा छळ होतोय,मग इतरांची काय अवस्था असेल ? सर्वसामान्य काय यातना भोगत असतील ? त्यांची किती पिळवणूक होत असेल ? या विचारांनी ज्ञानेश्वर अस्वस्थ झाले.त्यातून त्यांनी प्राचीन ग्रंथानी आपल्या अधिकार प्राप्तीचे मार्ग सांगितले आहेत काय हे शोधण्यासाठी त्या ग्रंथांचे अध्ययन सुरू केले.अनेक विद्वान,पंडित,सर्वसामान्य माणसे अशांशी चर्चा केली.अखेरीस कोणतेच उचित उत्तर न मिळाल्याने नवा मार्ग स्वीकारला.आणि ते लेखणीतून व्यक्त होऊ लागले.श्री.म.माटे म्हणतात तशी ‘पारमार्थिक लोकशाही ‘ स्थापन करण्याचा तो प्रयत्न होता.
ज्ञानेश्वरांनी आपल्या लेखणीतून सर्वसामान्य माणसांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडली.भोळ्या भाबड्या जनतेला भक्तीतून मुक्ती मार्गाकडे नेले.प्रापंचिक माणसांसाठी त्यांनी वेगवेगळ्या वाटा सांगितल्या.इतकेच नव्हे तर त्या त्या वाटांवर कुठे कुठे फसवणूक,वाटमारी होण्याची शक्यता आहे त्याच्या पूर्वसूचनाही दिल्या.भजन आणि कीर्तनाच्या सहाय्याने समाजाला जागृत केले.एका व्यापक समाजाभिमुख जाणिवेतुन ज्ञानेश्वरीची निर्मिती त्यांनी केली आहे.अशी व्यापक समाजहितैशी भूमिका घेऊन दबलेल्यांचा आवाज होणारे ज्ञानेश्वर देवनागरीचे आद्य बंडखोर साहित्यिक आहेत.म्हणूनच तमाम बंडखोरांचे ते आद्य मार्गदर्शक आहेत.’विश्व स्वधर्म सुर्ये पाहो ‘ यासाठी ग्रंथरचना करणाऱ्या ज्ञानेश्वरांचे विचार वैभव अतिशय व्यापक स्वरूपाचे आहे. एवढ्या कोवळ्या वयात एवढा प्रज्ञावंत पाहून स्तिमित व्हायला होते.ज्ञानेश्वरी हा केवळ पारायणाचा विषय नाही तर तो आचरणाचा आहे.पारायणाने बाह्य रंग दिमाखदार दिसतो हे खरे ,पण आचरणाने अंतरंग उजळून निघते हे त्याहून खरे आहे.कारण कर्म आणि नीती यांचा विचार फार सुक्ष्म पद्धतीने ज्ञानेश्वरांनी मांडला.श्रेष्ठ दर्जाचे अध्यात्म आणि उच्च दर्जाची नीती एकत्र नांदू शकते हे त्यांनी दाखवून दिले.ज्ञानेश्वरांच्या पसायदानातून नैतिक दृष्टिकोनाचा व्यापकपणा दिसून येतो.
ज्ञानेश्वरांनी पसायदानातून असे मागणे केले आहे की,’खल बुद्धीच्या लोकांचा दुष्टपणा नाहीसा व्हावा,सत्कर्माची त्यांना अधिकाधिक गोडी लागावी,जीवमात्रांच्या ठिकाणी परस्परांबद्दल मित्रभाव निर्माण व्हावा,मांगल्याचा वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठांचा संतमेळा तयार व्हावा,जगाला सज्जनांची सोयरीक लाभावी,पापाचा अंधकार नाहीसा व्हावा,कर्तव्य कर्माच्या सूर्याच्या उदयाने सारे विश्व उजळून निघावे,सर्व प्राणीमात्रांना त्यांचे इप्सित साध्य व्हावे,त्यांना लौकिक व परलौकीक यश प्राप्त होऊन सर्वजण समाधानी होवोत.’ मानवी कल्याणाची ही कसदार प्रार्थना फार महत्वाची आहे.या पसायदानावरून ज्ञानेश्वरांचा भक्तीविचार हा ऐहिक दुःखे विसरायला लावणारा,पळवाटा शोधणारा ,व्यक्तिगत मोक्षाची मागणी करणारा नव्हता हे स्पष्ट होते.त्यांचा भक्तियोग,कर्मयोग,नितीयोग संकुचित नाही.तर तो संकुचित विचार परंपरेने चालत आलेल्या विकृत साधनेतून मुक्त करणारा,दीन दलितांच्या आत्मोन्नतीचा मार्ग मोकळा व प्रशस्त करणारा,संपूर्ण समाजाच्या व्यक्तिमत्वाला उभारी देणारा आहे.प्रत्येकाच्या कर्तव्य कर्माचे महत्व सांगून समाजधारणेच्या तत्वांचा पुरस्कार करतो.साधकाने निष्काम कर्माचे अनुष्ठान केले तर तो बसल्या जागीच संन्यासी होतो असे सांगत ज्ञानेश्वरांनी कर्मसंन्यास व कर्मयोग यातील भेदच काढून टाकला.
ज्ञानेश्वरांनी कर्मसंन्यासाचा पुरस्कार कधी केला नाही.निष्काम कर्मयोगाचा विचार आग्रहाने मांडला.समाजामध्ये कर्मठ आणि कर्मभ्रष्ट अशा दोन टोकांच्या भूमिका वाढू लागल्या होत्या म्हणून त्यांनी कर्मयोगाचा मध्यममार्ग समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला.बाह्य संन्यासापेक्षा अंतरंग संन्यास महत्वाचा आहे आणि डोक्याच्या मुंडनापेक्षा मनाचे मुंडन महत्वाचे आहे हे त्यांनी बजावले.स्वधर्म कर्म आणि सत्कर्म यांच्यामुळे चित्तशुद्धी होते ही भूमिका मांडली.स्वधर्माचा अर्थ कर्तव्यकर्म असा आहे असे सांगत धर्मदृष्टीला एक नैतिक स्वरूप दिले.’धर्मासी नितीसी | सेस भरी || अशी धर्म व नीती यांना एकत्र आणण्याची इच्छा ज्ञानेश्वर व्यक्त करतात.भक्त हे नीतीचे,चारित्र्याचे आदर्श असतात हे त्यांचे सांगणे फार महत्वाचे आहे. आज बहुतांश भक्त,नीती आणि चारित्र्य यांचे परस्पर संबंध ज्ञानेश्वरांना अभिप्रेत होते त्यापासून कोसो मैल दूर आहेत हे वास्तव आहे .
ज्ञानेश्वरांपासून सर्वच संतांनी आपला जीवनविषयक दृष्टीकोन शब्दबद्ध करून ठेवला आहे.म्हणूनच ‘संत ‘शब्दापाठोपाठ ‘साहित्य ‘शब्दही येतो.संतसाहित्य हे केवळ भक्तिरसाचे साहित्य नाही तर ते लोक प्रबोधन,लोक जागरण,लोक चळवळ यांना चालना देणारे आहे.अध्यात्मवादाला मानवतावादाची बैठक देण्याचा त्यांचा प्रयत्न काळाच्या पुढे जाणाराच होता.संत अवतारी वगैरे नव्हते तर सर्वसामान्य लोकांतूनच आलेले होते.म्हणून तर ते सर्वसामान्यांच्या व्यथा वेदना जणू शकत होते.या वेदना कमी करायच्या असतील तर समाजाला शिक्षित केले पाहिजे ही त्यांची धारणा होती.संत त्याकाळचे आदर्श लोकप्रतिनिधी व समाजसेवक होते.’ब्राम्हविद्येचा सुकाळू | आनंदाचे आवरू || असे सव्वा सातशे वर्षांपूर्वी सांगणारे ज्ञानेश्वर ‘सर्वांसाठी शिक्षण ‘हेच तर सांगत होते.
संत चमत्कारी नव्हते.ज्ञानेश्र्वर ते तुकाराम या काळातील चारशे वर्षात संतांनी कोणत्याही चमत्काराशिवाय महाराष्ट्राला झोपेतून हलवून जागे केले.जनतेला ज्ञात असलेल्या भाषेतच जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले.’माझा मराठाची बोलू कौतुके!परी अमृतातेही पैजेसी जिंके !!’असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांना संस्कृत व मराठी या दोन्ही भाषा एकाच सिंहासनावर विराजमान करायच्या होत्या.मराठी भाषेचा असा उपयोग त्यावेळी होणे याचे भाषिक व सांस्कृतिक महत्व मोठे होते.या भाषेतूनच त्यांनी सांसारिकते पासून पर्यावरणा पर्यंतचे विविध विषय प्रभावीपणे मांडले.ढोंगीपणा उघड केला.शेत नांगरतानाही मोक्ष साधना करता येते हे स्पष्ट करून कर्मकांडाला विरोध केला.जातिव्यवस्थेला विरोध केला.भोंदू गुरुबाजीवर प्रहार केला.
आपल्याकडील ज्ञानाचा अहंकार बाळगून समाजाला अज्ञानी ठेऊ पाहणाऱ्यांवर ज्ञानेश्वर कोरडे ओढतात.पढिक पंडितांनी समाजाचे नुकसान केले असे ते सांगतात.”मोराच्या अंगी असोसे | पिसे अहाती डोळसे | परी एकली दिठी नसे | तैसे ते गा ||”असे ते म्हणतात.म्हणजे मोराच्या पिसांना डोळे असतात पण त्यांना दृष्टी नसते,तसेच काही पढिक पंडितांना ज्ञानाचे डोळे आहेत पण त्याचा ते योग्य वापर करत नाहीत,परिणामी ते डोळे असूनही आंधळेच ठरतात हे स्पष्ट करत सर्वसामान्य जनतेच्या दुरावस्थेचे आणि परावलंबितत्वाचे मूळ अज्ञानातच आहे हे त्यांनी सांगितले.समाजजीवनाला एका नव्या वाटेवर आणण्याचे युगप्रवर्तक कार्य ज्ञानेश्वरांनी केले.मनजागरणातून जनजागरण होईल हा खात्रीचा आशावाद त्यांनी मांडला.संत विचार वैभवाची ही दिंडी पुढे गेली पाहिजे.अर्थात हा पुढे जाण्याचा प्रवास स्वतःपासून सुरू करावा लागतो.चित्तशुद्धी आणि आत्मविकास ही या दिंडीत सामील होण्याची पूर्वअट आहे यात शंका नाही.
आज ज्ञानराया तुझियाच प्रेरणेने
या पालखीत गझला घालून नेत आहे..
अजान वृक्षाखाली ज्ञाना हेच म्हणाला
पानोपानी गझल दिसावी नवीन वर्षी..
चराचराच्या साठी लिहून गेला ओव्या
सखा खरा विश्वाचा पसायदानी ज्ञाना...
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी च्या वतीने गेली बत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)