कोवळ्या मनामध्ये सुसंस्काराची पेरणी !




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

विविध मैदानी खेळ ,व्यायाम ,प्रार्थना ,वाचन ,थोर महापुरुषांच्या कार्याची महती पटवून देणे अशा विविध माध्यमातून कोवळ्या मनावर चांगले संस्कार होणे ही देशाच्या चांगल्या भवितव्यासाठी पूरक गोष्ट आहे... त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रखर देशभक्तीची भावना जागृत करणे ,थोर महापुरुषांच्या कार्याचा आदर्श निर्माण करणे ,समाजाप्रती बांधिलकी जोपासणे ,सर्वधर्मसमभाव निर्माण करणे ,योग - ध्यानधारणातून मन व शरीर बलदंड करणे अशा सुसंस्कारांची पेरणी करणे ,हे देखील सामाजिक कर्तव्य आहे...याच भावनेतून नुकताच संत निरंकारी मंडळाने उदात्त ध्येयाने प्रकाशित केलेली संस्कारधन ,छोट्या गोष्टी - मोठे बोध अशी बाल संस्कारशील पुस्तके गुरु कन्नननगर व जुना चंदूर रोड परिसरातील मुलांना उदय धामणे व निर्भय पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले...यासाठी निमित्त होते आमचे जीवलग मित्र संतोष पाटील यांच्या वाढदिवसाचे..।

या दोन्ही पुस्तकात स्वामी विवेकानंद ,छत्रपती शिवाजी महाराज ,गौतम बुध्द ,साने गुरुजी ,महात्मा गांधी ,गुरुनानक , भक्त प्रल्हाद ,कर्ण , लोकमान्य टिळक अशा कार्याचार व्यक्तींच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग कथन करत त्यातून बोध घेत स्वतःचे जीवन समाजहिताच्या कार्याने उजळून टाकण्याचे मौलिक मार्गदशन करण्यात आले आहे...या वैशिष्ट्यांमुळेच हे पुस्तक नव्या पिढीचे मस्तक सुधारुन त्यांना सुसंस्कारित व सक्षम बनवेल ,असा पक्का विश्वास वाटतो...

आजच्या टिव्ही केबल ,संगणक व मोबाईलच्या जमान्यात मुला - मुलींचा चांगली पुस्तके वाचनाकडे कल कमी झाला आहे... याला पालक म्हणून आपण सगळेच जबाबदार आहोत...त्यामुळे ही चूक वेळीच सुधारुन कोवळ्या मनावर चांगले संस्कार होवून त्याची प्रभावी जडणघडण व्हावी , प्रखर देशभक्तीच्या भावनेबरोबरच ते बलशाली व्हावेत ,देशाच्या विकासात योगदान द्यावेत ,यासाठी वाचन संस्कृती चळवळ जोपासून ती वाढवली पाहिजे...यातून पुस्तक सुधारते मस्तक हा उदात्त हेतू साध्य होवून देशाची सुसंस्कारित भावी पिढी विधायक कार्याचा दीपस्तंभ ठरेल ,असा विश्वास वाटतो...म्हणूनच आमच्या छोटेखानी कार्यक्रमात लहान मुलांना संस्कारशील पुस्तके वाटप करुन त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करतानाच सुसंस्काराची पेरणी व व्यक्तीमत्व विकासाची जडणघडण करण्याचा प्रामाणिक हेतू आम्हा सर्वांच्या मनाला खूप मोठा आनंद देवून गेला...यावेळी उद्याचे बलशाली राष्ट्रवीर असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील निखळ आनंदाचा भाव आम्हांला अशा विधायक कार्याची चळवळ अविरतपणे चालू ठेवण्यासाठी दिशा दाखवणारा ठरला...!


- सागर बाणदार

Post a Comment

Previous Post Next Post