प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
ऊन ,वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता रात्रं - दिवस काबाडकष्ट करणारा जगाचा पोशिंदा म्हणजेच बळीराजा त्याला कधी सुट्टी असते ,ना कधी विश्रांती.पण ,या सा-याला काही काळासाठी थोडं बाजूला ठेवत शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडीचे २१ शेतकरी बांधव आज शनिवार ४ डिसेंबर रोजी दुपारी बेळगांव ते हैद्राबाद असा प्रवास करण्यासाठी चक्क विमानाने रवाना झाले.
दरम्यान ,या प्रवासादरम्यान ते शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत व आरोग्याची पुरेशी काळजी घेत हैद्राबाद शहर रामोजी फिल्मसिटी पाहण्याबरोबरच सहलीचा मनमुराद आनंद लुटणार आहेत. त्यामुळे या विमान सहलीची चर्चा आता शिवनाकवाडी पंचक्रोशीत जोरात सुरु आहे.
जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजाची ओळख असली तरी त्याला काबाडकष्टाच्या न चुकणा-या चक्रातून स्वतःबरोबर कुटूंबा सोबत जगायला म्हणावी तशी फुरसत मिळत नाही. त्यामुळे त्याचे जगणे हे घाण्याला जुपलेल्या बैलासारखे दुर्दैवी समजले जाते.काबाड कष्टातून मिळवलेला पैसा ,संपत्तीचा वापर स्वतःच्या आनंद व सुखासाठी उपयोगात आणता येत नसेल तर हे सारेच निरुपयोगी मानले जाते.त्यामुळे कधीतरी स्वतःसाठी सहलीच्या आनंदातून मनसोक्त जगता यायला हवे कधी तरी चक्क विमानातून प्रवास करता यायला हवा ,याचे महत्व लक्षात घेवूनच शिवनाकवाडीचे सुपूत्र व शिक्षक शिवाजी लक्ष्मण खोत ( दाजी) यांनी पुढाकार घेत गावातील शेतकऱ्यांना बेळगांव ते हैद्राबाद असा विमान प्रवास घडवून त्यांना हैद्राबाद शहर ,रामोजी फिल्मसिटी पाहण्याची जय्यत तयारी पूर्ण केली होती. या साठी गेल्या महिन्या भरा पासून अगदी शेतकरी प्रवासी गोळा करण्यापासून तिकीट रक्कम गोळा करणे ,प्रवासातील सोयी सुविधा ,आरोग्याची पुरेशी काळजी या सर्वांचे नेटके नियोजन आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुरु ठेवून ते पूर्ण केले आहे.आज शनिवार दिनांक ४ डिसेंबरला दुपारी शिवनाकवाडीचे शिक्षक शिवाजी लक्ष्मण खोत ( दाजी) व सरपंच सचिन खोत ( सातारे )यांच्या सह २१ शेतकरी बांधव बेळगांव ते हैद्राबाद असा प्रवास करण्यासाठी चक्क विमानातून रवाना झाले आहेत. या दरम्यान ,या सर्वांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत व आरोग्याची पुरेशी काळजी घेतली आहे.
त्यामुळे या प्रवासाचे कुतूहल सर्वांनाच लागून राहिले आहे. रात्रं -दिवस शेतात घाम गाळून जगाला अन्नाची सोय करुन देणारा शेतकरी बांधव कधीतरी या सा-यातून थोड्या काळासाठी का असेना विश्रांती घेत विमानाच्या प्रवासाचा ,हैद्राबाद शहर व रामोजी फिल्मसिटी अशा प्रेक्षणीय स्थळांबरोबरच विमानात बसून प्रवास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारलेले अनुभवणार आहे. त्यामुळे उंच आकाशातील विमानाच्या भरारीसारखाच स्वप्नांचा प्रवास भरारी घेण्याचे त्यांचे मनातले स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे.त्या मुळे या विमान प्रवासाच्या सहलीचा आनंद शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात आहे. याशिवाय या विमान प्रवासाच्या सहलीची चर्चा आता शिवनाकवाडी पंचक्रोशीत जोरात सुरु आहे.