इचलकरंजीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना विरोधात जोरदार निदर्शने

 



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

बंगळुरू येथील सदाशिवनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, यामागचा मुख्य सूत्रधार शोधून हे कृत्य करण्यामागचे कारण काय आहे याचा शोध घ्यावा, या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने इचलकरंजीत

कॉ. के. एल. मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कर्नाटक सरकार विरोधात घोषणा देत संतप्त शिवभक्तांनी कर्नाटक राज्याचा प्रतिकात्मक ध्वज जाळला. 

बेंगळुरू येथील सदाशिवनगरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केल्याची घटना समोर आली. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असून इचलकरंजी शहरातही याबाबत विविध ठिकाणी निषेध नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत असून यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही, असे कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले. तसेच पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास शहरात एकही कर्नाटक बस येऊ देणार नाही, असा इशारा दिला.

यावेळी या समाज कंटकांवर कारवाईची मागणी करणारे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांना देण्यात आले. 

 यावेळी गजानन महाजन, प्रसाद जाधव, नागेश पाटील, मंगेश मस्कर, प्रकाश परीट, विनोद कांबळे, संतोष डफळे, सुशांत घोरपडे, सूरज इंगळे, दीपक कुंभार यासह सर्व विभाग प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

   दरम्यान, बेंगळुरू येथील या घटनेचा बजरंग दलाच्या वतीने शिवतीर्थ येथे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करत समाज कंटकांवर कारवाईची मागणी केली. यावेळी सोमेश्वर वाघमोडे, राजकरण शर्मा, संजय शिंदे, राजू शिंदे, सुजित कांबळे, सर्जेराव कुंभारसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post