पत्रकारिता क्षेत्रातील
१९ वर्षांचा टप्पा पूर्ण...
२० व्या वर्षात पदार्पण...
पत्रकारिता क्षेत्रातील माझ्या कारकिर्दीला आज दि.२७ डिसेंबर रोजी तब्बल १९ वर्षे पूर्ण झाली...या काळात अनेक भल्या - बु-या आलेल्या अनुभवांनीच मला घडवत राहिलं अन् आज देखील घडवाहेत...माझ्या कामाचं मनापासून कौतुक करतानाच नकळतपणे होणाऱ्या चुकाही दाखवून देण्याचं काम हितचिंतकांनी प्रामाणिक केलं...पत्रकारिता परमो धर्म, या तत्वाचा अंगीकार करत आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत राहणारी अनेक मंडळी या क्षेत्रात कार्यरत आहेत... यामध्ये मला माझे गुरुवर्य लोकमतचे व्रुत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे,लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी दयानंद लिपारे, जडणघडण मासिकाचे संपादक सागर देशपांडे,ज्येष्ठ पत्रकार आराधना श्रीवास्तव,महासत्ताचे उपसंपादक बसवराज कोटगी , नवा महाराष्ट्रचे उपसंपादक राजू पाटील ,
सकाळचे उपसंपादक प्रविण कुलकर्णी ,ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दिलीप सुतार ,ज्येष्ठ गझलकार प्रा.डॉ. सुनंदा शेळके
अशा अनेकांचा आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो...आज पत्रकारितेचे क्षेत्र दिवसागणिक बदलत असतानाही आपल्या तत्वांना जीवापाड जपून निष्ठेने कर्तव्य पार पाडणारी मंडळी पाहिली की, पुन्हा नव्या दमानं काम करण्याची उर्मी मिळत राहते...याचा अनुभव अनेकदा मला घेता आला...खरंतर या सा-यामध्ये माझी पुरेशी योग्यता नसतानाही मला काम करण्याची संधी देतानाच लिखाणाचे स्वातंत्र्य देवून माझ्यातील क्षमतांना अधिक विकसित करण्यात दैनिक महासत्ताचे संपादक आदरणीय वसंतराव दत्तवाडे, व्यवस्थापक तरुण दत्तवाडे, दैनिक महान कार्यचे संपादक विजय पवार यांचे भरीव योगदान राहिले आहे... मुद्रितशोधक,बातमीदार आणि उपसंपादक या माध्यमातून चालत आलेला इथंपर्यंतचा प्रवास मला लौकिकार्थाने सम्रुध्द करणारा आहेच, याशिवाय चांगला माणूस म्हणून घडण्यासाठी देखील उपयुक्त ठरत चालला आहे,अशी माझी प्रांजळ भावना आहे... २७ डिसेंबर २००२ साली माझ्या पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली गेली असली तरी देखील आजतागायत दररोजच्या नवनव्या अनुभवातून शिकणं सुरुच आहे ,अन् ते शेवटच्या क्षणापर्यंत सुरुच राहिल...माझ्या लिखाणामुळे ज्यांना जगण्याची नवी उर्मी मिळून चेहऱ्यावर आनंद पसरला, तोच क्षण ख-या अर्थाने माझ्यासाठी खरी शाश्वत कमाई अन् मनाला सुख मिळवून देणारा ,असं मी मानतो...जसं काम करताना बरंच काही चांगलं शिकत असताना काहींनी मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्नही केला...पण त्यांचा हा प्रयत्न मी माझ्या कामाच्या जोरावर हाणून पाडण्यात यशस्वी ठरलो,याचे मला आजही समाधान आहे...
दुस-यांच्या कामाचे श्रेय स्वतः लाटण्याची प्रव्रुती अन्य क्षेत्राबरोबरच या क्षेत्रात देखील आहे, हे मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल...पण,म्हणून काही चांगल्या हेतूने काम करायचं, मुळीच सोडायचं नसतं ,हे देखील मला माझ्या मित्रमंडळी आणि हितचिंतकांकडून शिकायला मिळालं... या सा-या प्रवासात ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी चालवण्यात येणाऱ्या साखरशाळा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या, कामगारांचे हालाखीचे जीवन,भांडवलदारांची मग्रुरी, गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींचे विश्लेषण ,पोलिस खात्यातील चांगुलपणा आणि भ्रष्ट प्रव्रुत्ती,यंत्रमाग उद्योगाबरोबरच सर्व सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सातत्याने लिखाण करता आले...यातून देखील समाजातील काही घटकांना प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि समाजाची बोथट बनत चाललेली संवेदना मनाला अस्वस्थ करत राहतानाच आपल्याला पत्रकारितेच्या माध्यमातून मिळालेल्या लेखणीच्या आधारे कर्तव्य भावनेने काहीतरी करत राहण्याची जाणीव कायमपणे कार्यप्रव्रुत्त करण्यास भाग पाडत राहिली आहे...
चांगल्या कामातून मिळणारी ओळख हीच खरी आपली ओळख असते, हेही अनुभवांती आता कुठे कळत चाललंय... कधी कधी माझं लिखाण पाहून काहींना प्रश्न पडतो की,हे मी स्वतः लिहलंय का म्हणून ? तसं ते विचारतात देखील...यामध्ये त्यांची काहीच चूक नसते,कारण ते मला पूर्वीचा समजूनच माझे लिखाण वाचत असावेत... जेव्हा त्यांना मी याबाबत सविस्तरपणे सांगतो,तेव्हा मात्र ते माझे मनापासून कौतुक करतातच आणि म्हणतात ,तू इथंपर्यंत पोहचशील असं आम्हाला कधी वाटलं देखील नव्हतं,आणि हे सारं पाहून आम्हाला खूप आनंद झाला आणि तू अशीच प्रगती करत रहा,असा आशिर्वाद आणि अन् भरभरुन शुभेच्छाही द्यायला विसरत नाहीत... हे सारं अनुभवताना माझंही मन आनंदानं भरुन जातं...विशेष म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्था व संघटनांच्या कामाशी मला जोडून घेता आले...यामध्ये माणुसकी फौंडेशन ,इचलकरंजी नागरिक मंच ,सर्व श्रमिक दल अशा संघटनांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल... अन् समाज ऋणातून उतराई होण्यासाठी काही वर्षांपूर्वी आम्ही समविचारी मित्रांनी सुरु केलेल्या सत्कार्य सोशल फौंडेशनच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक साहित्य व
संस्कारशील पुस्तके वाटप करणे , राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे ,विधायक कार्यासाठी प्रोत्साहन देणे ,राष्ट्रीय सण व उत्सवांचे महत्त्व पटवून देत ते सामाजिक उपक्रमाची जोड देत साजरे करणे ,अशा कामातला आनंद व उत्साह हा जगण्याचा खरा अर्थ शिकवणारा आहे...
काही दिवसांपूर्वीच मी एका कामानिमित्त वस्त्रनगरीतील नामांकित शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमंत गंगामाई हायस्कूलमध्ये गेलो असतानाच त्याठिकाणी कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर यांना भेटलो...त्यांनी मला पाहताच आनंदाने स्वागत करुन खुर्चीवर बसण्यास विनंती केली,तसा मी ती त्यांच्या विनंतीला मान दिला...आणि त्या म्हणाल्या, सागर,तू शाळेत असताना खूपच सुमार दर्जाचा होतास,आणि आता तू पत्रकार आहेस, चांगले लिखाण करतोस हे सारं पाहताना असं काही घडेल, यावर माझा विश्वासच नाही बसत...तुझी ही प्रगती पाहून खूप समाधान वाटतंय बघ,असं म्हणतानाच त्यांच्या चेह-यावर आपल्या या विद्यार्थ्यांविषयी कौतुकाची भावनाच दिसत होती... खरंतर मी आठवीत असताना गोविंदराव हायस्कूलमध्ये त्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या..त्यामुळेच कदाचित त्यांच्या मनात आजही आपल्या विद्यार्थ्यांविषयी काळजी, प्रेम ,आपुलकी असावी...हे सारं काही अनुभवत राहतानाच खूप काही मिळाल्याचं समाधानही मनात दाटत राहून ते नकळतपणे डोळ्यातून आनंदाश्रूने निथळत राहिलं...
पत्रकारितेतला माझा १९ वर्षांचा ठप्पा तसा फार काही मोठा नसला तरीही समाज जीवनातील दररोजच्या घडामोडींतून मला स्वतःला तरी अनुभवाने खूप सम्रुध्द करणारा,असाच आहे...या पुढचा हा अविरत प्रवास सुरु ठेवताना माझ्या हातून निरपेक्षपणे समाजसेवा घडावी,यासाठी तुम्हा सर्वांचे आशिर्वाद अन् शुभेच्छा अशाच कायम राहोत ,हीच ईश्वराकडे माझी मनोभावे प्रार्थना....!