प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरात दोन दिवसांपूर्वी चंदूर ओढा परिसरात दुचाकीस्वाराला अडवून वाटमारी करणार्या पोलिस रेकॉर्डवरील रफिक उर्फ सद्दाम सनदी आणि शुभम कोळी या सराईत दोघा गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलिसांंनी अटक केली आहे. या दोघांकडून रोख रक्कम, सोन्याची चेन, 2 मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच त्यांच्याकडून आणखीन चोर्या, घरफोडी, चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली आहे.
इचलकरंजी येथील अवधुत आखाडा परिसरात राहणारेयोगेश पाटील हे दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून सायंकाळच्या सुमारास इचलकरंजीहून चंदूरकडे निघाले होते. ते काळा ओढा परिसरात आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पाटील यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवत पाटील यांच्याकडील २३ ग्रॅमची सोन्याची चेन, रोख २३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच याबाबत कोठेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी योगेश पाटील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू असताना सोन्याचे दागिने विक्रीसाठी दोघे इचलकरंजीत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पंचगंगा साखर कारखान्याकडून दुचाकीवरून कबनूरच्या दिशेने निघालेल्या सद्दाम सनदी आणि शुभम कोळी या दोघांना संशयावरून थांबवले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी योगेश पाटील यांची वाटमारी केल्याची कबुली दिली. तसेच पाटील यांची सोन्याची चेन आणि रोख रक्कम मिळून आली. पोलिसांनी सोन्याची चेन, रोख रक्कम, २ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. संशयित सद्दाम सनदी हा जवाहरनगरातील संतोष जाधव खून प्रकरणानंतर झालेल्या जाळपोळीच्या गुन्ह्यातील फरार होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हेही दाखल असल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले. दोघा संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन पाटील, विजय माळवदे, सुनिल बाईत, सागर चौगुले, गजानन बरगाले, प्रविण कांबळे आशुतोष शिंंदे, सतीश कुंभार यांच्या पथकाने केली.