प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
मागील पाच वर्षात इचलकरंजी नगरपालिकेत सत्तेत असलेल्यांनी काय कारभार केला हे जनतेला कळाले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्ता पिपासू भाजपाला खाली खेचून महाविकास आघाडीची सत्ता आणून परिवर्तन घडवूया. त्याच बरोबर काँग्रेस पक्षाला पुन्हा बलशाली बनवूया असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर पालकमंत्री नामदार सतेज पाटील हे शुक्रवारी विविध विकासकामांच्या निमित्ताने इचलकरंजीत आले होते. त्यावेळी त्यांनी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीला सदिच्छा भेट दिली.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विठ्ठलराव डाके होते. यावेळी शहरातील अनेक महिला व तरुणांनी नामदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या सर्वांचा नामदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नामदार सतेज पाटील म्हणाले, जनता सुज्ञ असून पाच वर्षात इचलकरंजी शहराचा विकास करण्याऐवजी शहर भकास करणार्यांना आगामी निवडणुकीत निश्चितपणे जागा दाखवून देईल. काँग्रेस पक्षाने सातत्याने आम आदमी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. शहराचा सर्वांगिण विकास हवा असेल तर नगरपालिकेत सत्ता असणे आवश्यक आहे. आणि आगामी निवडणुकीत निश्चितपणे महाविकास आघाडीची सत्ता असेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रारंभी स्वागत शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबासो कोतवाल यांनी केले. प्रास्ताविकात प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी, काँग्रेस पक्षाची भूमिका व सद्यस्थिती, भाजपाकडून सुरु असलेले स्वार्थी राजकारण, नगरपालिकेतील भाजपाची सत्ता आणि शहराची दूरवस्था या संदर्भात सविस्तर मांडणी करताना शहराच्या विकासासाठी नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणे गरजेचे असल्याचे सांगत शहराच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी केली.
यावेळी इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक राहुल खंजिरे, उपाध्यक्ष शशिकांत देसाई, शहर महिला अध्यक्षा सौ. मिना बेडगे, सौ. अनिता बिडकर, डॉ. विलास खिलारे, तुकाराम अपराध, रॉबिन कांबळे, रवि वासुदेव, संग्राम घुले, मुन्ना खलीफा, सौ.विद्या भोपळे, सौ. कळंत्रे तसेच माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते,नगरसेवक प्रकाश मोरबाळे, राजवर्धन नाईक यांच्यासह अन्य उपस्थित होते.