इचलकरंजी पालिकेत नगररचनाकारांच्या कार्यपध्दतीबद्दल नाराजी



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी पालिकेच्या सभेचा अजेंडा मला मिळालेला आहे असे म्हणत मी सही करणार नाही अशी भूमिका नगर रचनाकार माया कुलकर्णी यांनी घेतली .त्यामुळे नगर रचनाकारांच्या कार्यपध्दती बद्दल नाराजी व्यक्त करत संतप्त झालेल्या उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी थेट नगररचनाकार केबिन गाठले.यावेळी नागरिकांची कामे होत नाहीत व तुमच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत असे म्हणत त्यांनी नगररचनाकारांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी संतप्त होत त्यांनी शिवीगाळ सुरु केली.त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. या वेळी नगरसेवकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

इचलकरंजी पालिकेच्या नगररचना माया कुलकर्णी यांच्या कार्यपध्दतीबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.याबाबत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्याकडे देखील तक्रारी आल्या होत्या.याच प्रश्नावरुन आज नगररचना माया कुलकर्णी व उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक वादावादी झाली. यावेळी उपनगराध्यक्षांनी थेट नगररचनांची केबिन गाठून नागरिकांची कामे वेळेत का होत नाही याबाबत नगररचनाकार माया कुलकर्णी यांना जाब विचारला.तसेच तुमच्या कार्यपध्दतीबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढत चालल्याचे सांगत त्यांना चांगलेच धारेवर धरले.तसेच संतप्त होत त्यांना शिवीगाळ केली.

याच दरम्यान ,निम्याहून अधिक नगरसेवक व अधिकारी हे सर्वजण या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार हे संतप्त होवून शिवीगाळ करत होते. ते काही केल्या शांत होत नव्हते.तर नगररचनाकार माया कुलकर्णी या देखील शांत होत नव्हत्या. त्यामुळे दोघांनाही शांत करण्याचा नगरसेवकांनी प्रयत्न केला.पण ते शांत होत नव्हते.याचवेळी अनेक वेळा समजावून सांगितले तरीही कुलकर्णी मॅडम ऐकत नाहीत , अशा तक्रारी काही नगरसेवक व नागरिकांकडून

होऊ लागल्या.यावेळी ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये नगररचनाकार माया कुलकर्णी यांनी व्हिडिओ शूटिंग करून मी पोलीस केस करणार आहे ,अशी भूमिका घेतली.यावर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी याबाबत मला कोणताही फरक पडत नाही , तुम्ही काय वाटेल ते करा असे बजावले.या नंतर मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल हे सदर ठिकाणी आले. त्यांनीही दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.तसेच अशोक स्वामी व काही नगरसेवक यांच्यात बैठक झाली.तरीही नगररचनाकार माया कुलकर्णी या शांत होत नव्हत्या.उलट मी पोलीस केस करणार आहे.घडलेल्या सर्व घटनेचे माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड आहे , असे सांगितले.

यानंतर बराच वेळ हा वाद सुरू होता. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या वादानंतर अखेर तानाजी पोवार हे आपल्या केबिनमध्ये निघून गेले. या नंतरही प्रमुख नेत्यांची व नगररचनाकार यांची बैठक सुरू होती. अखेर मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी नगररचनाकार माया कुलकर्णी यांची समजूत काढली.पण तरीही त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.तर दुसरीकडे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार हे मात्र समजावून सांगितल्यानंतर शांत झाले होते.दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण पालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तर संपूर्ण दिवसभर या घटनेची चर्चा सुरू होती.

Post a Comment

Previous Post Next Post