प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी /प्रतिनिधी
येथील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा 2021 सालचा संस्कृती काव्य पुरस्कार सातारा येथील कवयित्री अंजली ढमाळ यांच्या शब्दालय प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'ज्याचा त्याचा चांदवा' या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पाच हजार रोख, शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून रविवार दिनांक 12 डिसेंबर रोजी इचलकरंजी येथे होणाऱ्या पहिल्या संस्कृती साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष कवी अजय कांडर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करून कवयित्री ढमाळ यांना गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार निवडीसाठी कवी मधुकर मातोंडकर आणि कवयित्री नीलम यादव यांनी काम पाहिले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिली.
इचलकरंजी येथील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे विचारांच्या पातळीवर शहरात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील एका उत्तम कवितासंग्रहाला पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय या निमित्ताने संस्थेने घेतला आहे.या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध भागातील नव्या कवींबरोबर मान्यवर कवींही सहभागी होत त्यांनी आपले काव्यसंग्रह पाठविले. या संग्रहामधून उत्कृष्ट काव्यसंग्रह म्हणून श्रीमती ढमाळ यांच्या 'ज्याचा-त्याचा चांदवा' या संग्रहाची निवड करण्यात आली असल्याचे श्री कांबळे यांनी सांगितले.
या पुरस्कार निवडी बद्धल परीक्षक मातोंडकर आणि श्रीमती यादव म्हणतात, कवयित्री अंजली ढमाळ यांच्या 'ज्याचा त्याचा चांदवा' या काव्यसंग्रहातील कविता एका विशिष्ट विचारधारेला बांधून न घेता ती समग्रपणाने जगण्याला भिडू पाहते. म्हणूनच त्यांची कविता मानवी दुःखाबरोबरंच नातेसंबंधांचे पदर अधिक घट्ट होण्याला महत्व देते. तसेच महापुरुषांचे अस्तित्व नाकारणार्या या काळात महापुरुषांच्या वैश्विक जाणिवेला आपल्या आत सखोल आपलेपणाने जपताना, त्यांचे अस्तित्व नाकारणाऱ्या वृत्तीला आवाजी स्वरूप न देताही प्रत्युत्तर देते. आजच्या साहित्याच्या अस्मितावादी काळात मानवी मूल्याला अधिक घट्ट करणारी ही गोष्ट आहे. खूप छोट्या छोट्या प्रतिमांमधून ही कवयित्री जगण्याची गुंतागुंत मांडताना, आजच्या काळाचे अंतर्विरोध समजून घेते आणि काही अल्पाक्षरी कवितांमधून जगण्याच्या शतखंडित होत जाणाऱ्या अनुभवांना एकाग्रतेने सामोरी जाते. माणूस म्हणून आपल्यातील संवेदनशीलता सर्वश्रेष्ठ मानून संवेदनशीलतेचे मानवी नाते शेवटी माणसाशीच एकरूप व्हायला हवे, असा प्रार्थनेचा स्वर या कवितेच्या ठायी दिसतो. त्यामुळे या कवितेचं नातं थेट बुद्धाची करुणा, येशूची मानवता आणि कबिराच्या सर्वधर्मसमभावाशी सांगता येईल. म्हणूनच सोशल मीडियाच्या आजच्या काळात एकूणच मराठी कविता आवाजी होत जाताना अंजली ढमाळ यांच्या कवितेतील हा सर्वस्पर्शी प्रामाणिक भाव अत्यंत महत्वाचा असाच आहे, असं आपल्याला खात्रीने म्हणता येईल.
यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचे पदाधिकारी ,सदस्य उपस्थित होते.