महापालिकेसाठी 6 हजारांवर मतदारांची वाढ .
प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्ह्यात 34 हजारांवर मतदार वाढणार आहेत. दि. 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविलेल्या मतदारयादी संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रमांतर्गत नव्याने मतदार नोंदणीसाठी 47 हजार 209 अर्ज दाखल झाले.मतदारयादीतून नाव वगळण्यासाठी 12 हजार 921 अर्ज दाखल झाले आहेत. यासह यादीतील दुरुस्ती, मतदारसंघातील पत्ता बदलणे असे एकूण सर्व 69 हजार 313 अर्ज आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून मतदारयादी संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. यावर्षी 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हा कार्यक्रम झाला. याअंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणार्यांना नव मतदार म्हणून नावनोंदणी करता येते. यासह मतदारयादीत नोंद नसल्यास मतदार नोंदणी, मतदारयादीतील तपशिलात चुका असतील अथवा बदल करायचा असेल, मृत्यू, स्थलांतर अथवा दुबार या कारणास्तव मतदार यादीतील नाव वगळणे आणि एकाच मतदार संघात पत्ता बदलण्यासाठी अर्ज सादर करता येतात.
दाखल झालेल्या अर्जांवर निर्णय घेऊन 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. हीच यादी त्या वर्षी होणार्या जिल्हा परिषद आणि महापालिका, नगर पालिकांसह ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी, कोणीही मतदानाच्या अधिकारपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमही राबविले. तृतीयपंथी व्यक्तींचीही नोंदणी व्हावी, यासाठी विशेष शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर महापालिकेसाठी सुमारे 6 हजार 400 मतदार वाढण्याची शक्यता आहे. नव्याने नावनोंदणीसाठी कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या दोन्ही मतदारसंघांपैकी कोल्हापूर महापालिका हद्दीतील 8 हजार 500 अर्ज आले आहेत, तर 2 हजार 100 अर्ज मतदारयादीतील नाव वगळण्यासाठीचे आहेत.
नोंदणी, दुरुस्ती कार्यक्रमाला पाच दिवस मुदतवाढ
दरम्यान, नव्याने नावनोंदणी, नाव वगळणे आणि एकाच मतदारसंघातील पत्ता बदलणे या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने आणखी पाच दिवस मुदतवाढ दिली आहे.
- कोल्हापूर शहरात 6,500 नवमतदार
- नवीन नावनोंदणी 47,209
- नाव वगळणे 12,921
- तपशील दुरुस्ती 6,228
- एकाच मतदारसंघात दुसरीकडे नोंद 2,955