प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ/प्रतिनिधी :
शेतीत हायटेक यंत्रांचा वापर वाढला म्हणजे शेती आधुनिक झाली असे होत नाही. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करून त्याचे कष्ट कमी करणे आणि त्याची शेती किफायतशीर करणे म्हणजे आधुनिकता होय. यासाठी शेतीतील प्रयोगशीलता प्रवाही ठेवण्याची गरज आहे. हे काम शेतीप्रगती मासिकाने गेली १७-१८ वर्षे प्रामाणिकपणे केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले.
ते शेतीप्रगती आणि बदलते जग दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील (दादा) होते.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रावसाहेब पुजारी यांनी शेतीप्रगती मासिक सुरू केले. शेतकरी प्रबोधनाचे महत्वाचे काम त्यांनी नेटाने केले. अतिशय दर्जेदार अंकाची निर्मिती केली आहे. त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. एका भूमिपुत्रांच्या या कार्याला माझा सलाम आहे.
यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, आजच्या परिस्थितीत मासिक चालवणे खूप कठीण झालेले आहे. तरीही केवळ शेतकरी हिताची बांधिलकी म्हणून गेली १८ वर्षे रावसाहेब पुजारी शेतीप्रगती मासिक नेटाने चालवतात. दिवाळी अंकाची खूपच चांगल्या दर्जाची राहिलेली आहे. व्यावसायिक गुणवत्ता अधिक ठळकपणे सांगणारा हा अंक प्रत्येकाने वाचला पाहिजे.
शेतीप्रगतीचे संपादक रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले.
यावेळी चांगेज खान पटेल, अशोक कोळेकर, सर्जेराव शिंदे, अरुण शिंदे, रघुनाथ पाटील, बदलते जग चे कार्यकारी संपादक अजयकुमार पुजारी आदी उपस्थित होते.
फोटो ओळी -
शिरोळ येथे शेतीप्रगती व बदलते जग दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना गणपतराव पाटील, राजू शेट्टी, प्राचार्य राजेंद्र कुंभार, रावसाहेब पुजारी, अशोकराव कोळेकर आदी.