शासकीय जागेवरील अतिक्रमण प्रकरण चव्हाण यांच्या अंगलट आले .
प्रेस मीडिया वृत्तसेवा : युनूस लाडखान :
शिरोळ : उमळवाड ग्रामपंचायतीचे सरपंच गोरखनाथ भूपाल चव्हाण यांचे सरपंचपद रद्द केल्याचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावल्याने तालुक्यात जोरदार खळबळ उडाली आहे . शासकीय जागेवरील अतिक्रमण प्रकरण चव्हाण यांच्या अंगलट आले आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, उमळवाड ग्रामपंचायतीमध्ये गोरखनाथ भूपाल चव्हाण हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पत्नीच्या नावे गट क्रमांक 593/ 1 या शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या घरात पती गोरखनाथ चव्हाण मुलांसमवेत राहतात. याबाबतची तक्रार सुहास हरी तिवडे यांनी दि. 28/1/ 2020 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली होती.
दरम्यान, त्यावर दि. 16/11/21 रोजी सुनावणी होऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी ग्रामपंचायत अधिनियमन 1958 कलम 14(1) (ज-3) तसेच 16 अन्वये उमळवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी गोरखनाथ भूपाल चव्हाण हे रद्द केल्याचे घोषित केले. या निकालाने गावासह तालुक्यात जोरदार खळबळ उडाली आहे. खरतरं लोक प्रतिनिधीनी शासकीय मालमत्तेचे संवर्धन करणे गरजेचे असते, परंतु अनेकजण हडप करण्यात गुंतलेले पहायला मिळते. अशा लोक प्रतिनिधीसाठी हे एक चांगले उदाहरण म्हणावे लागेल. उमळवाड ग्रामपंचायतीचे सरपंचपद अपात्र झाल्याने आता उपसरपंचाकडे सरपंचपदाची जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत, सरपंच चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सदर निकाला विरोधात पुढे अपील करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.