6 डिसेंबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होईल.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची अधिसूचना सोमवारी निघाली. 6 डिसेंबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होईल. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शिराळ्याचे आ.मानसिंगराव नाईक आणि उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या जयश्रीताई पाटील यांची नावे जवळजवळ निश्चित झाल्याचे समजते. मात्र यासाठी पुन्हा एकदा महाआघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकीच्या फेर्या होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली गतीमान होणार असल्याचे स्पष्ट झाले.
महाआघाडीचे 17 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी निवडणुकीचा अहवाल सहकार निवडणूक प्राधिकरण व विभागीय सहनिबंधक कोल्हापूर याच्यांकडे पाठविला होता. सहकार प्राधिकरणाच्या आदेशानुसार निकालानंतर पंधरा दिवसात अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणे बंधनकारक आहे. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी सहकार विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली. 6 डिसेंबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होईल. सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणे, त्यानंतर अर्जाची छानणी, माघार आणि दोन्ही पदासाठी जादा अर्ज असल्यास निवडणूक होईल. दुपारी तीन वाजता अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी होणार असल्याचे सहाय्यक जिल्हा उपनिबंधक उर्मिला राजमाने यांनी सांगितले.
जिल्हा बँक निवडणूकीसाठी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळणार आहे. अध्यक्ष पदासाठी आ. मासिंगराव नाईक, विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, चिमण डांगे, सुरेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून अध्यक्षपदाला हुलकावणी मिळाल्याने आ. नाईक यांच्या गळ्यात पडणार असल्याचे स्पष्ट आहे. उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळणार आहे. जयश्रीताई मदन पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय महेंद्र लाड, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र पाटील यांच्या नावावर शिक्कोमार्तब झाल्याचे समजते.