प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सांगली : सांगली जिल्हा बँक निवडणूकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व येण्यास सुरुवात झाली आहे. २१ पैकी आता पर्यंत १० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून भाजपला केवळ १ जागा मिळाली आहे.रविवारी जिल्हा बँकेसाठी ८५.३१ टक्के इतके मतदान झाले. यात बँकेच्या संस्था व व्यक्तिगत अशा एकूण २ हजार ५७३ पैकी २ हजार १९५ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यापुर्वी बँकेच्या २१ जागांपैकी महाविकास आघाडीच्या ३ जागा बिनविरोध झाल्यामुळे १८ जागांसाठी निवडणूक पार पडली होती.
जिल्हा बॅंकेच्या २१ जागांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, महेंद्र लाड हे सोसायटी गटातून यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेत. त्यानंतर रविवारी १८ जागांवर मतदान पार पडले होते. त्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून काही धक्कादायक निकाल हाती येत आहेत.
जत मधील निकाल सर्वात धक्कादायक मानला जात आहे. जत सोसायटी गटात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून विद्यमान संचालक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत पराभूत झाले आहेत. त्यांचे विरोधक असलेल्या भाजपच्या प्रकाश जमदाडे यांना ४५ मत मिळाली तर विक्रम सावंत यांना ४० मत मिळाली. विषेश म्हणजे सावंत हे राज्याचे मंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत.
कडेगाव गटात मात्र विश्वजीत कदम यांच्यासाठी दिलासादायक निकाल आहे. कडेगाव सोसायटी गटात महाविकास आघाडीचे आमदार मोहनराव कदम ४२ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधातील भाजपचे तुकाराम शिंदे यांना अवघी ११ मत मिळाली. तिकडे कवठेमहांकाळ सोसायटी गटात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अजितराव घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. घोडपडे यांना ५४ मत मिळाली तर अपक्ष विठ्ठल पाटील यांना १४ मत मिळाली आहेत.
कवठेमहांकाळमध्ये ६८ मत असून याठिकाणी १०० टक्के मतदान पार पडले होते. मिरज सोसायटी गटात महाविकास आघाडीचे विशाल पाटील हे ३६ मतांनी विजयी झाले आहेत. भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनेलचे उमेश पाटील यांना १६ मत मिळाली तर विशाल पाटील यांना ५२ मत मिळाली.
आटपाडी सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे तानाजी पाटील हे हि ११ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा पराभव केला. तासगाव गटात महाविकास आघाडीचे बी. एस. पाटील १८ मतांनी विजयी झाले असून त्यांनी भाजपचे सुनिल जाधव व विद्यमान संचालक आणि अपक्ष उमेदवार डॉ. प्रताप पाटील यांना पराभूत केले. वाळवा सोसायटी गटात विद्यमान अध्यक्ष महाआघाडीचे दिलीप पाटील हे एकतर्फी विजयी झाले असून त्यांना १०८ मत मिळाली. तर त्यांचे विरोधक भाजपचे भानुदास मोटे २३ मत मिळाली.