स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुमधूर सुरेल मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'दिवाळी पहाट' मध्ये सप्तसुरांची उधळण करत दिवाळीला सुमधुर सुरांचा साज पनवेलकरांना अनुभवायला मिळाला. निरागस सुरांचा फराळ, विरळ धुक्याची झालर, त्यात सुटलेला प्रसन्न पहाट वारा, सुर्याची सुवर्ण किरणे आणि क्षितिजाला गवसणी घालणाऱ्या स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुमधूर सुरावर रसिकांनी भरभरून दाद दिली. यावेळी संपुर्ण सात्विक व आल्हाददायी, मनमोहक वातावरणाने पनवेल मंत्रमुग्ध झाले होते. या सुरेल मैफिलीचे पनवेलकरांनी कुटुंबासह व मित्रपरिवारांसह मनमुराद आनंद घेतला.
स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल अर्थात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन पनवेल शहरातील नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या वडाळे तलावाच्या प्रांगणात करण्यात आले होते. श्रोतेगण म्हणून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, वैद्यकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी यावेळी उपस्थित होती. उत्तम नियोजन, संयोजनामुळे या कार्यक्रमाला चार चांद लागते होते. त्यामुळे सर्व श्रोत्यांनी आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले.
दिवाळी पहाटेचे एक अनोखे नाते आहे. दिवाळी अंकांसोबतच मराठी-हिंदी भावस्पर्शी गाण्यांनी दिवाळीची पहाट सुरेल करण्याची परंपरा जपायला मराठी रसिकांना आवडते. या कार्यक्रमामध्ये नाट्यसंगीत, अभंग, भक्तिसंगीत, सिनेसंगीतातील गाणी सादर केली गेली. त्यामुळे दिवाळी पहाटेचा हा अनुभव पुढील अनेक दिवसांसाठी नवा उत्साह देणारा ठरला. अनेक गाणी अप्रतिम सादर करून रसिकांमध्ये चैतन्य खुलविले. तसेच दिलखेच अदाकारी सादर केली त्याचबरोबरीने तबला, पेटी, पखवाज, हार्मोनियम अशा वाद्यवृंद समूहानेही आपल्या वादनातून उपस्थितांची वाहवा मिळवली. पहाट एवढी रंगली होती कि रसिकजण सुरांच्या ठेक्यात आणि सुरांनी त्यांच्या हृदयात घर केले होते. '
अलबेला सजन आयो रे', 'दिल कि तपीश', 'सूर निरागस हो', 'कानडा राजा पंढरीचा', 'वल्लभा लक्ष्मी वल्लभा', असे अनेक सुरेल संगीताचा खजिना यावेळी सादर होत असताना रसिकांनीही भरभरून दाद दिली. वडाळे तलावाच्या निसर्ग कुशीत हा कार्यक्रम झाल्याने या सुमधुर मैफिलीला चार चांद लागले होते. दिवाळी पहाटेचे पाचवे वर्ष होते. कोरोना संदर्भातील शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून अत्यंत शिस्तप्रिय हा कार्यक्रम झाला. संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आवर्जून उपस्थित होते. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, मनोज भुजबळ, हरेश केणी, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका दर्शना भोईर, चारुशीला घरत, रुचिता लोंढे, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, माजी नगरसेविका मंदा भगत, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत दिसले, यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी,तसेच नागरिक कुटुंबियांसह हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.