पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची कारवाईची मोठी मागणी... अन्यथा साखळी उपोषणाचा दिला इशारा.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल तालुक्यातील ओव्हरलोडिंग, अवैध मालवाहतूक, अवैध पार्किंग करणाऱ्या क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभागाचा अर्थपूर्ण मेहरबानी असल्याने या वाहनांवर कारवाई करण्यास आरटीओ विभाग टाळाटाळ करीत असल्याने या अवजड वाहनावर कारवाई करण्याची मागणी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन व संसदीय कार्य मंत्री, परिवहन आयुक्त यांच्याकडे ईमेलद्वारे पत्र पाठवून केली असल्याची माहिती सोनावणे यांनी दिली.
पनवेल तालुक्यात ओव्हरलोडिंग, अवैध मालवाहतूक आणि ट्रक, कंटेनरच्या अवैध वाहतुकीवर,अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी शासनाने आदेश दिले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणारी वाहने शहरातील रस्त्यांवर रोजच दिसतात. ओव्हरलोडिंग वाहतुकीमुळे अनेकदा गंभीर अपघात घडतात. याला आळा घालण्याची जबाबदारी आरटीओकडे आहे. ओव्हरलोडिंग आणि नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने रोज शेकडो नागरिकांना अपघातांमध्ये जीव गमवावे लागतात. रस्ते अपघातांमध्ये रोज हजारो नागरिक जखमी होतात. क्षमते पेक्षा अधिक मालाची वाहतूक करणारी वाहने अपघातांना कारणीभूत ठरतात. शहरात अनेकदा असे अपघात घडले आहेत. मोठ्या क्षमतेचे 6 ते 14 चाकी ट्रक बेकायदेशीर वाहतूक करताना जिवावर उठतात. आरटीओ अधिकारी रस्त्यावर नसल्याने अवजड वाहतुकदारांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून ओव्हरलोडिंग वाहतूक केली जात आहे. शिवाय अवैध मालवाहतुकीच्या घटना देखील घडत आहेत. तसेच अवजड वाहनांमुळे पनवेल तालुक्यातील अपघातांचे प्रमाण देखील वाढत चालले आहे.
स्टील मार्केट रस्त्यावर बेकायदेशीर रित्या पार्किंग ...
उप-प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्वरित विशेष भरारी पथक तयार करण्यात यावेत, त्याचबरोबर कळंबोली सर्कल, स्टील मार्केट परिसर व इतर ठिकाणी बेकायदेशीर रित्या पार्किंग करणाऱ्या वाहनांवर देखील वेळीच कारवाई करावी अशी मागणी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे. त्याच बरोबर प्रवास करणारे अवजड वाहनांवरील प्रवास करणारे वाहनचालक, रत्स्यावरील नागरिक यांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पनवेल आरटीओची असेल, तसेच लवकरात लवकर या अवजड वाहनांवरील कारवाई केली नाही तर पनवेल आरटीओच्या विरोधात कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा पनवेल तालुका संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी ईमेलद्वारे पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे.