प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी: सुनील पाटील
दीपावलीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने नवीन पनवेल येथे कुलाबा किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्याचे पूजन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक सचिव ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 31) झाले.
या कार्यक्रमास रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पोवळे, पनवेल मनपा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, खोपोलीचे नगरसेवक सचिन मोरे, प्रकाश गाडे, भाजप भटके विमुक्त महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे, ‘रामप्रहर’चे व्यवस्थापक दादाराम मिसाळ यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. या वेळी सह्याद्री ब्लड डोनर्स आणि स्कीमर्स फॅमिली पनवेल रक्तवाहिनी यांनी नऊ हजारपेक्षा जास्त लोकांना रक्ताचा मोफत पुरवठा केल्याबद्दल आणि तीन हजार लोकांना मोफत प्लाझ्मा व 600पेक्षा जास्त लोकांना बेड मिळवून दिल्याबद्दल दर्शन म्हात्रे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी बोलताना ओमप्रकाश शेटे यांनी, दिवाळी अशी साजरी करा की, आपल्या एका खरेदीने शेतकर्याचे, सर्वसामान्याचे जीवन उंचावले पाहिजे हा विचार घेऊन येथून जा. आजूबाजूला जी सामन्य माणसे छोटा व्यवसाय करीत आहेत त्यांच्याकडून खरेदी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची दिवाळी साजरी करा, असे आवाहन केले.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी मनाची श्रीमंती असलेली खरी दिवाळी साजरी करणारी मंडळी पनवेलमध्ये आहेत, असे सांगून दहा वर्षांपूर्वी राजे शिवराय प्रतिष्ठानच्या छोट्या रोपट्याने आज जलदुर्ग कुलाबाची भव्य प्रतिकृती उभारल्याबद्दल त्यांचे शेटे यांनी कौतुक केले आणि येणार्या काळात दुर्ग संवर्धन करून न थांबता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा विस्तार होईल, असे सांगितले.
आपण या कार्यक्रमाची पत्रिका ब्रॉडकास्ट लिस्टवर ज्येष्ठ समाजसवेक अण्णा हजारे यांच्या पीएला पाठवली, त्या वेळी अण्णांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे नाव वाचून त्यांना आपण सन 2009मध्ये जाहीर पाठिंबा दिल्याचे सांगितले. अण्णांचे सर्टिफिकेट मिळणे यापेक्षा काय पाहिजे. चारित्र्यसंपन्न, व्यसनमुक्त लोकप्रतिनिधी दुर्मिळ असतो. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपात या भागाला असा नेता लाभला याचा मला आनंद वाटतो, अशा शब्दांत शेटे यांनी त्यांचे कौतुक केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आपल्या संस्कृतीचे वैभव म्हणजे दिवाळी. समाजजीवनात नवा प्रकाश यावा या भावनेतून सुरू झालेला हा उत्सव. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपली संस्कृती आहे. तुम्ही आम्ही ताठ मानेने जगू शकलो. त्यामुळे आपल्या आनंदाच्या क्षणी त्यांचे स्मरण करायचे, त्यांच्या गडकिल्ल्यांना उजाळा द्यायचा, त्यांचा वारसा जतन करून पुढच्या पिढीकडे द्यायचा आहे. त्यासाठी राजे शिवराय प्रतिष्ठान पुढे येत आहेत. त्यांनी लावलेली ज्योत संपूर्ण महाराष्ट्रभर पेटताना पहायला मिळत आहे. त्याबद्दल प्रतिष्ठानचे मनापासून कौतुक. आपल्या माध्यमातून सर्वांना छत्रपतींचा इतिहास माहीत व्हावा यासाठी पनवेल महापालिकेच्या महापौर कविता चौतमोल, स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी व इतर नगरसेवक आपल्या माध्यमातून निश्चितपणे काम करतील.
शेट्ये यांनी केलेल्या सामाजिक कामाचेही या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून जो आदर्श पुढे सांगायचा आहे त्याची ही अत्यंत योग्य अशी सुरुवात आहे. हा चिरंतन वारसा पुढे जपण्यासाठी, संस्कृतीची ही नाळ आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या परीने हातभार लावावा, असे आवाहन करून त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.