रायगड जिल्ह्यातील सुमारे ९०० एसटी कर्मचारी कामावर पुन्हा रुजू
पेण, महाड, रोहा, श्रीवर्धन आणि माणगाव आगारांतून एसटी बस पुन्हा धावू लागल्या
प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनिल पाटील :
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कामगारांनी दिवाळीच्या अखेरीस काम बंद आंदोलन सुरू केले. या आक्रमक पवित्र्यामुळे एसटीची चाके थांबली.आता राज्य सरकारने वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवल्याने या संपामध्ये फूट पडल्याचे दिसते. रायगड जिल्ह्यातील सुमारे ९०० एसटी कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. पेण, महाड, रोहा, श्रीवर्धन आणि माणगाव आगारांतून एसटी बस पुन्हा धावू लागल्या आहेत.
एसटीचे रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे २५०० कर्मचारी आहेत. अलिबाग, पेण, कर्जत, महाड, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, मुरूड हे आगार असून सुमारे ५१० बस आहेत. तुटपुंज्या पगारात सेवा देताना या कर्मचाऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे होते. त्यामुळे त्यांनी भाऊबीजेनंतर ८ नोव्हेंबरपासून संप पुकारला. राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची त्यांची प्रमुख मागणी होती. त्यांनी २० दिवस हे आंदोलन केले. सेवा बंद असल्याने रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या कालावधीत रायगडमध्ये एसटी महामंडळाला सुमारे सात कोटींपेक्षा अधिक आर्थिक फटका बसला. त्यानंतर एसटी महामंडळाने रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.
त्यामध्ये निलंबनासह सेवा समाप्तीचे आदेश दिले. तसेच कर्मचाऱ्यांसमोर वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला. त्याचाच परिणाम म्हणून अखेर या संपामध्ये फूट पडली. गेल्या दोन दिवसांपासून सुमारे ९०० कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत.आठ आगारांपैकी पेण, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, महाड या पाच आगारांतून एसटी बस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.
काही कर्मचाऱ्यांचे निलंबन रोखले
संपामुळे एसटीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचा ठपका ठेवत महामंडळाने रायगड जिल्ह्यातील ९० एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले. गेल्या दोन दिवसांपासून काही एसटी कर्मचारी कामावर हजर झाल्याने त्यांचे निलंबन रोखण्यात आले आहे. मात्र कामावर हजर न झालेल्या अन्य २४ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रण कार्यालयाकडून देण्यात आली.
संप पुकारून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून आले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन व सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- अनघा बारटक्के,
विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ रायगड विभाग
मुरूडमध्ये प्रवाशांचा संताप
एसटी कामगारांच्या संपामुळे मुरूड आगारातून एकही बस सुटत नसल्याने प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप आहे. मुरूड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी आगारप्रमुखांना या संदर्भात निवेदन दिले असून कामावर रुजू होण्यासाठी अनेक कामगार उत्सुक आहेत. अशा कामगारांना काही कामगार जाणीवपूर्वक रोखत आहेत, अशी तक्रार केली आहे. आगारप्रमुखांनी पोलिस बंदोबस्त देत सेवा सुरू करावी. आगारप्रमुखांनी याबाबत नियोजन करावे. बससेवा सुरू न झाल्यास प्रवासी संघटना कामगारांविरुद्ध आंदोलन करणार आहेत, अशा इशाराही दिला आहे.