प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी: सुनील पाटील :
दीपावली सण विविध फराळ, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी, किल्ले बांधणी, शुभेच्छा आदींचा आगळावेगळा व उत्साहाचा सर्वात मोठा सण असतो, आणि या सणानिमित्त पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष उमेश चौधरी यांच्या पुढाकाराने पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणपाडा(खारघर) संपन्न झालेली 'दिवाळी पहाट' प्रफुल्लित व उल्हासमय वातावरणात पार पडली.
या सुरमयी कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दीपावली म्हंटली कि दिव्यांचा, आनंदाचा आणि संस्कृतीचा सण. या सणानिमित्त लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र आनंद आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळते. त्यात सुरांच्या अविष्कारांनाही अनन्य साधारण महत्व आहे. उमेश चौधरी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. यंदा दिवाळी पहाटचे हे अकरावे वर्ष होते. एकूण सोनेरी पहाट आणि सुरांची सुरेल बरसात होत दिवाळी पहाटने रसिकांना मंत्रमुगध केले. खारघर सेक्टर २७ मधील मॉर्निंग प्ले स्कुल समोरील प्लॉट क्रमांक ३६ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या सांस्कृतिक सोहळ्यात प्रसिद्ध गायक पंडित नंदकुमार पाटील, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी, मोतीराम कडू, अरुण म्हात्रे, जगन्नाथ मढवी यांचे गीत गायन सादर झाले. यावेळी पखवाजवर सुनिल म्हात्रे, किरण भोईर, तबला निषाद पवार व विनायक प्रधान, हार्मोनियमवर नंदकुमार कर्वे यांची तर सूत्रसंचालक म्हणून नितेश पंडीत यांची साथ साथ लाभली. हि संगीतमय मैफिल यशस्वी करण्यासाठी आयोजक पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष रायगड भूषण पंडित उमेश चौधरी, मंगेश चौधरी व अक्षय चौधरी आणि सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.