प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
पुणे : वर्ष १९४८ पासून मागील दोन तीन वर्षापर्यंत पुणे शहराची ओळख शिक्षणाचे माहेरघर अशी होती. ही ओळख पुण्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) दिली . परंतु आता ती ओळख कालबाह्य होणार की काय ? कारण गेल्या दोन-तीन वर्षात पुणे विद्यापीठात चित्रपटाच्या शूटिंगचा विषय वादग्रस्त होत आहे. सध्या देखील चित्रपटाचे शूटिंग चालू आहे .बहुधा भाडेकरार झाला असावा .विद्यापीठास यामुळे आर्थिक हातभार लागेल असे वाटते. परंतु हा आर्थिक हातभर शैक्षणिक किंवा विद्यार्थी हिताकरीता उपयोगी होईल का? की अधिकाऱ्यांना अवैध भत्ते वाटण्यात जाणार व त्यावर कोणी आक्षेप घेतल्यानंतर चौकशी समिती नेमणार किंवा जनता काही वर्षांनी ते विसरून जाणार .
विद्यापीठाची जागतिक क्रमवारीत शंभर क्रमांकाने घसरण झाल्यानंतर कोरोणाच्या महामारीचे (पेंडामिक )कारण सांगितले जाते. तसेच सध्याच्या चित्रपटाच्या शूटिंग करिता घेतलेला निर्णय पंडेमिक असावा. यापूर्वीच्या ब-याच कुलगुरूंनी, कुलसचिवांनी विद्यापीठ अनुदान आयोग ,सायन्स अँड टेक्नॉलॉजी ,मनुष्यबळ विकास मंत्रालय ,समाज कल्याण, सामाजिक न्याय विभाग ,राष्ट्रीय उच्चतर शिक्षा आयोग यांचेमार्फत शिक्षण व संशोधन यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी विद्यापीठात आणला होता व त्याचा योग्य वापरही केला होता . यावेळी विद्यापीठाचा आवार चित्रीकरणासाठी उपलब्ध करण्याची वेळ का आली?
चित्रपटांना विद्यापीठ आवार भाड्याने देण्याचे दुसरे कारण असू शकते. गेल्या दोन-तीन वर्षात विद्यापीठाकडे पंधरा ते वीस महाविद्यालयांनी स्वायतत्ता घेऊन स्वतःची स्वायत्त महाविद्यालय सुरू केली. त्यामुळे विद्यापीठास आर्थिक झळ पोहोचली असावी आणि हा मार्ग अवलंबला असेल. तसे पाहिले तर विद्यापीठात चित्रपट शूटिंग नवीन नाही. यापूर्वी कल आज और कल, बॉबी ,प्रेमग्रंथ ,मंगल पांडे, मुक्ता (मराठी १९९४ )अशा बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते .परंतु २०१८ मध्ये एका चित्रपटाचे चित्रीकरण वादग्रस्त विषय ठरल्याने विद्यापीठ प्रकाश झोतात आले होते .अद्याप या गोष्टीचा विसरही पडलेला नसताना आज पुन्हा चित्रीकरणाचा प्रकार विद्यापीठाने का करावा..? हा परीक्षेच्या निकालाचसारखा गोपनीय प्रश्न आहे .विद्यार्थी हित ,शिक्षण ,संशोधन हे विषय आता भरकटू लागले आहेत .
यापुढे शिक्षण संशोधनावर भर देण्यापेक्षा प्रत्येकाने आपले चेहरे रंगवून नौटंकीची तयारी करावी अशी चिन्हे दिसत आहेत.