लोणावळ्या जवळील वाघेश्वर गावात बांधलेल्या आपल्या फार्म हाऊसला माती महल असे नाव दिले आहे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुण्यातील एका वास्तुविशारद जोडप्याने सुमारे 700 वर्षांपूर्वीचे तंत्रज्ञान वापरून बांबू आणि मातीचे दोन मजली घर बांधले आहे.युगा आखरे आणि सागर शिरुडे यांनी लोणावळ्या जवळील वाघेश्वर गावात बांधलेल्या आपल्या फार्म हाऊसला माती महल असे नाव दिले आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या तौकते चक्रीवादळाचा या घरावर काही परिणाम झाला नाही.
युगा आणि सागर यांनी बांबू आणि मातीपासून घर बांधण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिथे मुसळधार पावसामुळे घर बांधणे किती मूर्खपणाचे ठरेल असे सांगण्यात आले. मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिलेल्या या दोघांनी 700 वर्षांपूर्वीचे तंत्र वापरून माती महल उभारला.
या दोघांनी पुण्यातून पदवी घेतल्यानंतर 2014 मध्ये सागा असोसिएटस् ही कंपनी सुरू केली. अनेक घरे आणि इमारतींचे डिझाईन केले. युगा सांगते, जेव्हा आम्ही भिंत बनवण्यासाठी माती खणायला सुरुवात केली, तेव्हा वाया जाणाऱया मातीचा पुनर्वापर करता येईल का? असा विचार करत आम्ही सिमेंटच्या रिकाम्या पोत्या घेतल्या आणि त्या मातीने भरल्या. या कामात अनेक वस्तूंचा पुनर्वापर केला.
या घरासाठी येथे उपलब्ध असलेला बांबू, लाल माती आणि गवत वापरले आहे. भिंतीसाठी जवळच्या जंगलातून कार्बोच्या रोपटय़ा आणि बांबूच्या चटया आणल्या. चिकणमातीसाठी मायरोबलन वनस्पतीपासून लाल माती, भुसा, गूळ, रस यांचे देशी मिश्रण घेतले. त्यात कडुलिंब, गोमूत्र, शेण मिसळले. जमिनीची तयारी आणि भिंतींना लेप गोमूत्र व शेणाच्या सहाय्याने केले असल्याचे सागरने सांगितले.
छप्पर बांबूच्या दोन थरांनी झाकलेले आहे. एक प्लॅस्टिकच्या कागदाने आणि दुसरे गवताने. या लेयर बायंडिंगमुळे पावसाळ्यात घरात पाणी येत नाही. घराच्या बांधकामासाठी चार महिने लागले. घरात व्हरांडा, स्वयंपाकघर, बेडरूम, बाथरूम आणि टेरेस आहे. या घराच्या भिंती उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहतात. याला कॉब वॉल सिस्टीम म्हणतात. घराला वेगवेगळ्या वातावरणापासून वाचविण्यासाठी बॉटल आणि डॉव तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, अशी माहिती दोघांनी दिली.