प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : आर्यन खान ड्रग प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असून वेगवेगळ्या व्यक्तींची नावे पुढे येत आहेत. मनीष भालुशाली, किरण गोसावी, सॅम डिसूझा, प्रभाकर सालील या चार नावांनी गेले महिनाभर धुमाकूळ घातला होता.त्यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. हे नाव म्हणजे सुनील पाटील.
भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी याबाबत खुलासा करत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. सुनील पाटील हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्याच पक्षाच्या नेत्याशी संबंधित असल्याचे सांगत माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या काळात तो बदल्यांचे रॅकेट चालवित असल्याचा आरोप केला. कुंभोज यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सोबतचाही पाटील याचा फोटो शेअर केला. त्यामुळे आता पाचवे नाव या प्रकरणात समोर आले आहे.
या प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्या नावाबद्दल अनेक गौप्यस्फोट करण्यात आले. त्यात ते समीर ज्ञानदेव वानखेेडे की समीर दाऊद वानखेडे आहेत, यावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद सुरू आहे. वानखेडे यांच्याकडे असलेला आर्यनखान ड्रग केसचा तपास काढून घेण्यात आल्यानंतर तो आता संजयसिंग यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे या केसमध्ये आता संजयसिंग हे नावपण पुढील काळात महत्वाचे ठरणार आहे.मूळचा धुळ्याचा असलेल्या सुनील पाटील याच्यासोबत कुंभोज यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची नावे जोडली. त्याल काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तातडीने उत्तर देत हा पाटील अमित शहांसोबतही असल्याचा व्हिडीओ शेअर केला. तसेच गुजरातच्या एका मंत्र्यांसोबतचा त्याचा फोटोही सावंत यांनी प्रसिद्ध केला. त्यामुळे या प्रकरणात अनेक नवीन नावे रोज जोडताना दिसून येत आहेत. एवढेच नाही तर हा सुनील पाटील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मंत्रीपदाच्या कालावधीत तो त्यांच्या बंगल्यावर सातत्याने दिसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्याही तो जवळचा असल्याचे बोलण्यात येते. नंतर मेटेंशी वाद झाल्याने तो दूर झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत मेटे किंवा पाचपुते यांच्याशी संपर्क झाल नाही. तो झाल्यावर त्यांचे म्हणणे देण्यात येईल.
क्रुझवरील ड्रग केसबाबतची सर्वात आधी माहिती या पाटीलकडे होती. ती त्याने सॅम डिझोजाला दिली, असा दावा कुंभोज यांनी केला आहे. ही सारी माहिती खोटी आणि अर्धवट असल्याचे सांगत नवाब मलिक यांनी याबाबत आपण आणखी काही माहिती देणार असल्याचे सांगत आणखी काही नावे समोर येणार असल्याचा इशारा दिला आहे.