उद्यानाचे उद्घाटन खासदार बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी उद्याने आवश्यक आहेत. हा विचार करूनच महापालिकेकडून शहरात उद्याने उभारली जात आहेत. त्यात आता सॅलीसबरी पार्क येथील उद्यानाची भर पडली असून हे उद्यान पुण्याच्या वैभवात भर घालणारे ठरेल अशा भावना खासदार गिरिश बापट यांनी व्यक्त केल्या.महापालिकेचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या प्रयत्नातून सॅलीसबरी पार्क येथे उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन खासदार बापट यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. भिमाले यांच्या वाढदिवसा निमित्ताने या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.
महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, उमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजप शहर संघटक राजेश पांडे , माजी नगरसेविका वंदना श्रीनाथ भिमाले यांच्यासह प्रभागातील नागरिक, भाजप कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
खासदार बापट म्हणाले , महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध संकल्पनेवरील उद्याने उभारली जात आहेत. शहराचे पर्यावरण तसेच नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी उद्याने मोलाची भूमिका बजावत असून पुण्यात 200 पेक्षा अधिक उद्याने असल्याने पुणे हे उद्यानांचे शहरही ओळखले जात आहे. त्यात, या नवीन उद्यानाची भर पडली असून शहराच्या विकासात या उद्यानाने हातभार लागणार असून सॅलीसबरी पार्क भागातील जास्तीत जास्त नागरीकांनी या उद्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी खासदार बापट यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा प्रवक्ते डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी केले.
असे आहे उद्यान
या उद्यानात बोनसाय पद्धतीचे वृक्ष, आकर्षक विद्युत रोषणाई, अम्फी थीएटर, आकार्षक सेल्फी पॉइंट, पगोडा, विविधरंगी फुलांची वृक्षे या सर्व बाबी या उद्यानाची खास वैशिष्ट्ये आहेत. या शिवाय, नागरिकांना चालण्यासाठी अत्याधुनिक पध्दतीचा ट्रॅक विकसित करण्यात आला असून स्वच्छतागृह, लहान मुलांसाठी खेळणी असणार आहेत. तर उद्यानात पावसाळयातही सहज चालता येईल अशा फरशा बसविण्यात आल्या असून उद्यानाच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी निवासी सुरक्षा रक्षक असणार आहे. या कार्यक्रमात गायक अवधूत गुप्ते यांनी भिमाले यांच्या जीवनावर आधारीत बोले तैसा चाले.. श्रीनाथ भिमाले या गिताचे अनावरण करण्यात आले. तसेच या लोकापर्ण सोहळया निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.