रविवारी पुणे विभागाच्या दौड आगारातून लालपरी धावली, तर सांगली, इस्लामपूर व कोल्हापूर या आगाराच्या गाड्या स्वारगेट आगारात दाखल
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचा संप ओसरण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी पुणे विभागाच्या दौड आगारातून लालपरी धावली, तर सांगली, इस्लामपूर व कोल्हापूर या आगाराच्या गाड्या स्वारगेट आगारात दाखल झाल्या.स्वारगेट आगारातील संपातील कर्मचाऱ्यांनीदेखील त्यास कोणत्याही प्रकारचा मज्जाव केला नाही. रविवारी पुणे विभागात जवळपास ६६ गाड्या धावल्या. विशेष म्हणजे यात १० लालपरी व एशियाड गाड्याचा समावेश होता.
भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत हे आंदोलनातून बाहेर पडल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची तीव्रता कमी होत आहे. रविवारपर्यंत जवळपास १८ हजार कर्मचारी कामावर परतले. रविवारी दौंड आगाराच्या १० गाड्या धावल्या. दौंडहून पुणे, इस्लामपूर, सिद्धटेक आदी शहरांसाठी लालपरी धावली. पुणे विभागाचे जवळपास ५५० कर्मचारी रविवारी कामावर परतले. यात ५० चालक व वाहकांचा समावेश होता. चालक व वाहक कामावर परतण्यास सुरुवात झाल्याने लालपरी धावण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. एसटीनेदेखील आता जास्त कंत्राटदारांच्या गाड्या सोडण्यापेक्षा स्वतःच्या मालकीच्या गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे.
पुणे विभागातील तीन डेपो सुरू
संपाच्या पहिल्या दिवसापासून बंद झालेले पुणे विभागातील १३ डेपोंपैकी ३ डेपो आता वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. यात रविवारी स्वारगेट, शिवाजीनगर व दौंड या डेपोंचा समावेश आहे. तर शिरूर, तळेगाव, राजगुरुनगर, भोर, नारायणगाव, इंदापूर, सासवड, पिपरी चिंचवड, बारामती, बारामती एमआयडीसी हे आगार बंद आहेत. पुणे विभागाच्या ६६ गाड्या धावल्या. यात २१ शिवनेरी, ३५ शिवशाही व १० लालपरी गाड्यांचा समावेश होता.
-ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे
आमचा संप सुरूच आहे. रविवारी बाहेरच्या डेपोच्या काही गाड्या स्वारगेटमध्ये दाखल झाल्या. आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे विरोध केला नाही. आमचा लढा हा सुरूच राहणार आहे.
- संजय मुंडे, आंदोलक कर्मचारी, स्वारगेट आगार, पुणे.