प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवर अली शेख :
पुण्यात अंशतः ढगाळ वातावरणाचे चित्र कायम राहणार आहे. मात्र बुधवारपासून शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत थंडीला हळूहळू सुरवात होईल, असे हवामान खात्याने सांगितले.
शहर आणि परिसरात पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे आता पुन्हा किमान तापमानात ही काहीशी घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात ४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ झाली आहे.त्यामुळे सोमवारी दिवसभर उकाडा जाणवत होता.
गेल्या महिनाभरापासून शहर आणि परिसरात अंशतः ढगाळ वातावरण होते, विविध ठिकाणी पावसाने हजेरीदेखील लावली. त्यामुळे पुणेकरांची दिवाळी यंदा पावसाच्या सावटाखाली साजरी झाली. तसेच किमान तापमान हे १९ ते २० अंश सेल्सिअसदरम्यान असल्यामुळे काहीसा उकाडा जाणवू लागला होता.
राज्यात सोमवारपासून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार आहे, कोकणात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. राज्यात काही भागात सुरू असलेला पाऊस उघडीप देणार असल्यामुळे निरभ्र आकाश, सूर्यप्रकाशासह थंडी जाणवेल.