प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
जगभरात कुठेही काही घडलं, तर त्यावर देशात मूठभर लोकांकडून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, हे न कळणारे आहे. त्रिपुरातील घटनेवरुन काही मुठभर लोक मालेगावमधील देशभक्त मुस्लिम समाजबांधवांना बदनाम करण्याचं काम करत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया देणं हे पूर्णपणे चुकीचे आहे.
हडपसर जमीन प्रकरणी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाचे स्वागत करताना पाटील म्हणाले की, “माझ्या खोट्या सही, शिक्का आणि महसूल नंबरचे आदेश काढून जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला. यानंतर मी स्वतः या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून, हे प्रकरण अतिशय गंभीर असून, याची सखोल चौकशीची मागणी केली होती. तसेच अशाप्रकारे खोट्या आदेशाद्वारे असे प्रकार झाल्या का? याचा शोध घेण्याची विनंती केली होती. कारण उद्या विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याही नावे असे बनावट आदेश काढून जमीन बळकावण्याचा प्रकार होऊ शकतो.”
हडपसर जमीन बळकाणाऱ्या प्रकरणात फौजदारी कारवाई झाली असून, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना अजून काही करण्याचे बाकी नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.