आता प्रतिक्षा आहे ती शासनाच्या आदेशाची..!
प्रेस मीडि या वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : कोरोनाच्या दीर्घ लॉकडाउनंतर २० महिन्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहे सुरू करण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यापीठाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना नियमानुसार ऑनलाइन वाटप प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे.आता प्रतिक्षा आहे ती शासनाच्या आदेशाची!
मार्च २०२० पासून कोरोनाच्या साथीत वसतिगृहे बंद करण्यात आली होती. मात्र या काळात शासनाकडून कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी वसतिगृहे वापरण्यात आली नव्हती. आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांच्या निर्देशानुसार टप्प्याटप्प्याने वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहे. मुख्य वसतीगृह प्रमुख सचिन बल्लाळ म्हणाले,''वसतिगृहांची नियमित देखभाल पूर्ण करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पुढील आठवड्यातच ऑनलाइन वसतिगृह वाटप प्रक्रिया सुरू करत आहोत.'' वसतिगृहे बंद असल्यामुळे मागील आठ महिने संशोधक विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता महाविद्यालयांबरोबच विद्यापीठांतील विभागही शासन आदेशाने सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या आवारातील वसतिगृहे खुली करण्याची प्रक्रिया वेळेत सुरू होणे गरजेचे होते. आता ही प्रक्रिया सुरू झाली असून, कोरोनाच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच प्रवेश दिला जाणार आहे.
"दोनच दिवसांपूर्वी शिक्षण संचालकांसोबत यासंबंधी आढावा बैठक झाली आहे. विद्यापीठाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून, लवकरच ऑनलाइन वाटप प्रक्रियाही सुरू करत आहोत."
- डॉ. एन.एस.उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
"वसतीगृह दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले आहे. सुरवातीला ऑनलाइन वाटप प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून, शासनाच्या आदेशानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश दिला जाईल. पहिल्या टप्प्यामध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येत आहे."
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
आकडे बोलतात....
वसतिगृहांचा प्रकार ः संख्या ः प्रवेश क्षमता
मुले ः ९ ः १३४०
मुली ः ९ ः १२२७