प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : पुण्याची राजकीय संस्कृती ही वेगळी असते, असे नेहमीच म्हटले जाते. त्याचा प्रत्ययच आज आला. एक मेकांवर टक्केवारीचे आणि गुंडगिरीचे आरोप करणारे भाजप आणि राष्ट्रवादीचे नेेते एकाच गाडीतून पुढील बोलणी करण्यासाठी निघून गेल्याचे आज दिसून आले.हेच दोन नेते एकमेकांवर गुंडगिरीचे आणि टक्केवारीचे आरोप करत होते. त्यामुळे त्यांचे असे अवचित एकत्र जाण अनेकांच्या नजरेत भरलेभाजपचे पालिकेतील गटनेते गणेश बीडकर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यातील वाद गेल्या आठवड्यात जोरदार रंगला. भाजप हा गुंडांचा पक्ष असल्याचे सांगत जगताप यांनी जोरदार टीका केली होती. दुसरीकडे बीडकर यांनी राष्ट्रवादीवरही तसेच तिखट प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे या दोघांतील तिखटपणा कायम राहील, अशी चर्चा दोन दिवसांतच फोल ठरली आणि दिवाळीत तोंड गोड करून ते एकत्र फर्ग्युसन काॅलेजवरील रस्त्यावरील एका हाॅटेलमधून एकाच गाडीत बसून निघून गेले. या दोघांचेच तोंड गोड होण्यावर त्यांच्यात पक्षांतील इतर मंडळी आक्षेप घेणार का, याची आता उत्सुकता आहे.
बीडकर आणि जगताप हे वाडेश्वर कट्टा येथील दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी आले होते. महापौर मुरलीधर मोहोळ, प्रशांत जगताप, गणेश बिडकर, मनसेचे वसंत मोरे, काँग्रेसचे आबा बागुल यांच्यासह इतर मंडळी या फराळाला हजर होती. अंकुश काकडे,संदीप खर्डेकर यांनी दिवाळी फराळ आयोजित केला होता. सारे नेते गप्पा मारत असताना बीडकर आणि जगताप दोघेच एकाच गाडीतून निघून गेल्याचे पत्रकारांच्या नजरेतून सुटले नाही.
या कट्टयावरील गप्पांच्या वेळी सर्वपक्षीयांना एकमेकांना शालजोडीतील टोमणे मारले गेले. आगामी 2०२२ मध्ये महापालिका निवडणुकीत भाजप विरोधी पक्षात बसणार असून मोहोळ आणि बीडकर यांच्यात विरोधी पक्षनेते पदावरून वाद झाला तर या कट्ट्यावर पुन्हा आपण पण जमू, असे अंकुश काकडे यांनी खोचकपणे सांगितले. आजी, माजी महापौरांनी एकमेकांना लाडू भरून आलिंगन दिले. डॉ सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे, गोपाळ चिंतल, खर्डेकर यांनी देखील गप्पांत सहभाग घेतला.