मूळ कागदपत्रे सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही.

   विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीच्या अंतिम वेळेत मूळ कागदपत्रे प्राप्त करणे आवश्यक ठरणार आहे.

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीच्या अंतिम तारखेपर्यंत मूळ कागदपत्रे सादर करण्याच्या अटीवर परवानगी दिली होती. पहिल्या फेरीच्या अंतिम तारखेपर्यंत मूळ कागदपत्रे सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नयेत.
अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीची प्रक्रिया समजावून सांगावी, अशा स्पष्ट सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सर्व शिक्षण संस्थांना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीच्या अंतिम वेळेत मूळ कागदपत्रे प्राप्त करणे आवश्यक ठरणार आहे.

तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या आणि दुसऱ्या अंतिम फेरीचे जागावाटप प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवेशासाठी संस्थेत आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने हाताळावी, याबाबत 'सीईटी सेल'ने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत होत आहे. बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता काही दिवसांत विविध अभ्यासक्रमांची पहिली फेरी जाहीर होणार आहे. त्यादृष्टीने सीईटी सेलने या सूचना जाहीर केल्या आहेत.

प्रवेश दिल्यानंतर पुढील काळात विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रमाणपत्र अथवा कागदपत्रे खोटी असल्याचे आढळून आल्यास त्याचे प्रवेश ताबडतोब रद्द करण्यात यावेत. संस्थेत प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्याने जागा स्वीकृती शुल्क एक हजार रुपये भरल्याची खातरजमा करूनच प्रवेश द्यावा. एखादा विद्यार्थी त्याला झालेल्या जागा वाटपाची स्वत:च्या चुकीच्या पद्धतीने पडताळणी करून प्रवेशासाठी हजर झाल्यास, त्याचा प्रवेश निश्चित करण्यात येऊ नये. अशा विद्यार्थ्याला तातडीने तक्रार/हरकत नोंदविण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे सीईटी सेलने अधोरेखित केले आहे.

'सीईटी सेल'ने शैक्षणिक संस्थांना दिलेल्या सूचना :

  • विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या ऑनलाइन प्रणालीतून मिळणारी पावती व शुल्क भरल्याची पावती द्यावी

  • एखाद्या विद्यार्थ्यांस चुकीचा प्रवेश दिल्यास त्याची जबाबदारी संस्था व संस्था प्रमुखाची राहील

  • प्रवेश दिल्यानंतर पुढील काळात विद्यार्थ्यांने सादर केलेल्या कागदपत्रे, प्रमाणपत्रे खोटी असल्याचे आढळल्यास असा प्रवेश ताबडतोब रद्द करावा

  • विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने विनंती सादर केल्यानंतर त्याचा प्रवेश रद्द झाला, असे समजावे

  • विद्यार्थ्याने कोणत्याही वेळी प्रवेश रद्द केल्यानंतर संस्थेने पुढील वर्षांचे शुल्क मागू नये

Post a Comment

Previous Post Next Post