एसटी महामंडळाचे सणासुदीच्या काळात या संपामुळे प्रवाशांचे हाल ...

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. राज्यातील २५० पैकी २२० आगार बंद आहेत. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. 

पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर एसटी डेपो मध्यरात्रीपासून कर्मचारी संपात सहभागी, रात्री बारापासून एक ही एसटी बस या डेपोंमधून बाहेर गेलेली नाही, सकाळपासून स्वारगेट एसटी स्टँड येथे प्रवाशांची मोठी गर्दी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील सरपंच परिषदेसह इतर संघटनांकडून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झालीय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे.

एसटीच्या संपावर तोडगा काढण्यास राज्य सरकार तयार झालंय. संपाची कोंडी फोडण्यासाठी सरकार त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती ३ महिन्यांत न्यायालयाला अहवाल देणार असल्याची माहिती समोर आली आहे.



 *जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post