आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित विभागप्रमुखांची
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात व सर्व क्षेत्रीय कार्यालयात, करसंकलन विभागीय कार्यालये, सर्व शाळामध्ये, सर्व दवाखाने आणि रुग्णालये तसेच पालिके मार्फत कार्यक्रमांच्या आयोजनां मध्ये, पुनर्वापर न होणा-या प्लॅस्टीक वापराबाबत घालण्यात आलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.
पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा वापर न करता ग्लास अथवा धातूपासून निर्मित बाटल्यांचा वापर करण्यात यावा असे आदेशात नमूद केले आहे. प्लॅस्टीकपासून निर्मित वस्तूंच्या वापरावर घालण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याबाबत आयुक्त पाटील यांनी आदेश निर्गमित केले आहेत.२३ मार्च २०१८चे अधिसूचनेद्वारे प्लॅस्टीक हे अविघटनशील असल्यामुळे महाराष्ट्र शासना मार्फत प्लॅस्टीकचे उत्पादन, वापर विक्री, वाहतुक, हाताळणी आणि साठवणूकीवर बंदी घालण्यात आलेली आहे.
आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित विभागप्रमुखांची असून विभागामध्ये कोठेही प्लॅस्टीकचा वापर झाल्याचे आढळून आल्यास विभाग प्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल,आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्त पाटील यांनी दिला आहे.