अन्यथा न्यायालयात धाव घेतली जाईल... माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल ..
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
बोगस, खोटी आणि बनावट कागदपत्रे सादर करून पिंपरी-चिंचवड महापालिकेची 'श्रीकृपा' सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्यास महापालिका आयुक्तांकडून दिरंगाई केली जात असल्याचा हल्लाबोल माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केला.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना 'श्रीकृपा'वर कारवाई करण्याबाबतचे स्मरण पत्र पाठविले आहे. त्यात नगरसेवक बहल यांनी म्हटले की, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याच्या निविदेमध्ये श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा. लि या ठेकेदाराने खोटी कागदपत्रे सादर केली. अनुभवाचा बोगस दाखला निविदा प्रक्रियेसोबत जोडून महापालिकेची फसवणूक केली. याबाबत खातरजमा करुन बोगसगिरीचे सर्व पुरावे आपल्याला दिले. त्यानंतरही महिन्याभरापासून या ठेकेदारावर कारवाईस दिरंगाई केली जाते. त्यास पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु आहे.
प्रशासनातील काही अधिकारी, सत्ताधारी भाजपच्या नेतेमंडळींचे आर्थिक हित साधण्यासाठी केलेला हा गंभीर प्रकार झाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या ठेकेदाराची चौकशी करण्याऐवजी महापालिकेची फसवणूक केल्याची बक्षीसी म्हणून आरोग्य विभागातील कोट्यवधी रुपयांचे रस्ते साफसफाईचे काम देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि क्लेशदायक आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या ठेकेदाराला नवीन कोणतेही काम देऊ नये.
तसेच वैद्यकीय विभागाने जे मनुष्यबळ पुरवठ्याचे काम दिले आहे. त्याबाबत कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी बहल यांनी केली. महापालिकेची खोट्या कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा प्रकार आहे. त्यामुळे आयुक्त या नात्याने आपण तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र आपण कारवाई केली नाही. यावरुन आपण सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचे दिसून येते, असेही त्यांनी म्हटले आहे.