सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांचं सत्र जोरदार गाजत आहे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनिल पाटील :
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यात सध्या मोठा गदारोळ माजलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांचं सत्र जोरदार गाजत आहे. केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही टीका टिपण्ण्या करण्यात आल्या.आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही NCB ला टोला लगावला आहे.
नुकतंच गुजरातमध्ये ३५० किलो ड्रग्ज आढळून आल्याची बातमी समोर आली आहे. गुजरात मधल्या द्वारका भागातून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलं. या कडे ही लक्ष द्यावं असंच राऊत यांनी सुचवलं आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, द्वारकेत ड्रग्ज सापडणं ही चिंतेची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना ज्यांनी पाव ग्रॅम वगैरे ड्रग पकडून जागतिक किर्ती-ख्याती प्राप्त केली, एक ग्रॅम, पाव ग्रॅम, अर्धा ग्रॅम त्यांनी या ३५० किलो ड्रग्जचा अभ्यास करावा. याआधीही गुजरातमध्ये साडेतीन हजार किलो ड्रग्ज सापडले होते, साधारण २५ ते ३० हजार कोटी किमतीचे. त्याच गुजरातमध्ये हे साडेतीनशे किलो म्हणजे १०० कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे. आता त्यामध्ये गुजरात मधली सिनेसृष्टी, काही श्रीमंतांची मुलं अडकली असतील त्या लोकांनी पाहावं आता. NCB पथक नक्की तिथं काय काम करत आहे गुजरातमध्ये.हे सुद्धा देशाला कळावं.
काय आहे गुजरात ड्रग्स प्रकरण...?
गुजरातच्या द्वारकामध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल ३५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे तब्बल १७ किलो मेफेड्रोन आणि हेरोईन सापडलं आहे. हा आरोपी महाराष्ट्राचा असून मुंब्र्याचा रहिवाशी आहे. विशेष म्हणजे हा भाजी विक्रेता आहे. देवभूमी द्वारका पोलिसांनी ही करवाई केली असून आरोपीकडे सापडलेल्या ड्रग्जची किंमत ८८ कोटी २५ लाख इतकी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १९ पाकिटं जप्त केली आहेत. याशिवाय अजून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे ४७ पाकिटं सापडली.