एसटीच्या संपात फूट पडण्यास सुरुवात

शनिवारी तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांनी डय़ुटीवर हजेरी दाखवत सेवा बजावण्यास सुरुवात केली.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनिल पाटील :

 एसटीच्या संपात फूट पडण्यास सुरुवात झाली असून शनिवारी तब्बल 18 हजार कर्मचाऱयांनी डय़ुटीवर हजेरी दाखवत सेवा बजावण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर, रायगड आणि नाशिकसह महत्त्वाच्या 50 आगारांतील वाहतूक शनिवारी सुरू झाल्याने 'जय भवानी, जय शिवाजी'च्या गजरात आगारातून बसेस सोडण्यात आल्या.

रात्री सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार विविध आगारांतून 1046 बसेस सोडण्यात आल्या असून त्यातून 17,726 प्रवाशांनी प्रवास केली. दरम्यान, इतके दिवस शांततेत सुरू असलेल्या संपाला गालबोट लागले असून जळगाव, सोलापूर, नाशिक आणि बीड अशा ठिकाणी 11 ते 13 बसेसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत.


एसटीचे संपात रुतलेले चाक पुन्हा फिरू लागले असून रायगड जिह्यातील माणगाव आगार दीर्घकालीन संपानंतर सर्व कामगार डय़ुटीवर हजर झालेले पहिले आगार ठरले. तर कोल्हापूर जिह्यातील कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज, चंदगड या आगारांतील वाहतूक सुरू झाली. तर नाशिक विभागाच्या नाशिक-1 आगारातून 15 लाल परी बसेस रवाना झाल्या. कोल्हापूर जिह्यातील रंकाळा ते हुपरी मार्गावर पहिली एसटी धावल्याने शालेय विद्यार्थ्यांनी एसटी कर्मचाऱयांचे स्वागत करीत आभार मानले.

n नाशिक विभागात तीन बसेसवर दगडफेक झाली. बीड आगार तसेच जळगाव विभागाच्या चार बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. तर सोलापूर विभागाच्या दोन बसच्या काचा अज्ञातांनी फोडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास सुरू आहे.

शनिवारी 18,090 कर्मचारी हजर!

एसटी महामंडळातील 18,090 कर्मचारी शनिवारी डय़ुटीवर हजर झाले असून त्यात प्रशासकीय विभागाचे 8,671, कार्यशाळेचे-5,177, चालक 2130, वाहक 2112 असे 18,090 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर आज 3010 कर्मचाऱयांना निलंबित केले असून एकूण निलंबित कर्मचाऱयांनी संख्या 6277 झाली आहे. आज 270 रोजंदारी कर्मचाऱयांची सेवा समाप्त झाली असून एकूण 1496 जणांची सेवा समाप्त झाली आहे, तर 240 कर्मचारी नोटिसीनंतर हजर झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post