प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोरोना मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने 15 नोव्हेंबर पासून सानुग्रह अनुदानाची ही रक्कम वितरित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.राज्यात कोरोनाच्या संसर्गात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत देण्यासाठी राज्य सरकारने 700 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. कोरोनामुळे एक लाखहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे.
या मदतीचे वितरण करण्याच्या दृष्टीने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी सुरू केली आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी वेबसाईटची चाचणी सुरू केली आहे. दिवाळी झाल्यावर प्रत्यक्षात मदतीचे वाटप करण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी होईल, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱयामार्फत या सानुग्रह अनुदानाचे वितरण होईल. ही रक्कम डीटीबी पद्धतीने म्हणजे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल.
मदतीची रक्कम मिळण्यासाठी मृतांच्या कुटुंबियांना सरकारी छापील अर्ज किंवा रुग्णालयाच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आपत्ती निवारण निधी अधिकारी किंवा त्यांच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अर्जावर संबंधित यंत्रणेला तीस दिवसांत निर्णय घ्यावा लागेल. अर्जावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. अर्ज फेटाळण्यापूर्वी लेखी कारणे देणे समितीला बंधनकारक केले आहे.