राजकीय चिखलफेक थांबविण्यासाठी प्रमुख नेत्यांनी यातून मार्ग काढावा
प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनील पाटील :
एसटी कर्मचाऱयांसह अनेक महत्त्वाचे आणि अनेकांच्या जीवनमरणाचे प्रश्न आ वासून उभे असताना महाराष्ट्रात दररोज सुरू असलेली राजकीय चिखलफेक दुर्दैवी असून, हे कुठेतरी थांबायला हवे, असे परखड भाष्य शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केले.महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे. त्यामुळे ही राजकीय चिखलफेक थांबविण्यासाठी प्रमुख नेत्यांनी यातून मार्ग काढावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राजधानीत मीडियाशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. महाराष्ट्रात सध्या देवेंद्र फडणवीस विरुद्ध नवाब मलिक असा आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार राऊत यांनी परखड मत मांडले. लोकांच्या जीवनमरणाचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, सध्या दररोज दोन्ही बाजूंनी राजकीय चिखलफेक सुरू आहे. या लोकांना रोजच चिखलफेक करायचा कंटाळा तरी कसा येत नाही. ज्यांनी याला सुरुवात केली ते आता घाबरून पळून जात आहेत, असा टोलाही खासदार राऊत यांनी लगावला.
सध्याचे राजकारण साधूसंतांचे राहिलेले नाही. निवडणुका जिंकण्यासाठी आणि सत्ता मिळविण्यासाठी काय काय केले जाते, कोणत्या थराला लोक जातात हे आपण पाहतोच आहोत. राजकीय द्वेषातून ज्यांनी याची सुरुवात केली त्यांची सध्या पळताभुई थोडी झाली आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राची प्रतिमा जपली पाहिजे !
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात फक्त चरस, गांजांचेच पीक येते असा देशातील जनतेचा समज व्हावा, असे वातावरण तयार करण्यात आले आहे. आता गुंड, बदमाश, अंडरवर्ल्डशी संबंधित आरोपांचे राजकारण होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा जपायला हवी. हे चित्र योग्य नाही, असेही खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची माणसे आहेत. या दोघांनाही महाराष्ट्राच्या प्रतिमेची व प्रतिष्ठsची चिंता आहे. अशा महत्त्वाच्या माणसांनी आता हे थांबविण्यासाठी यातून मार्ग काढायला हवा, असेही ते म्हणाले.