आता त्यापेक्षा अधिक सांगण्यासारखे आपल्याकडे काहीच नाही....

अनिल देशमुख यांनी आज न्यायाधीशांना पत्र दिले



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

सुनिल पाटील :

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज न्यायाधीशांना पत्र दिले. 'आपण आतापर्यंत ईडीच्या 200 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.त्यामुळे आता त्यापेक्षा अधिक सांगण्यासारखे आपल्याकडे काहीच नाही. यापुढे ईडीची कोठडी नको' असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

अनिल देशमुख गेली दहा दिवस ईडीच्या कोठडीत आहेत. ईडीकडून त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचे सांगितले जाते. इतके दिवस चौकशी केल्यानंतरही ईडीने आज त्यांची कोठडी वाढवून द्यावी अशी विनंती पीएमएलए न्यायालयाला केली. त्यावर देशमुख यांनी न्यायाधीशांना पत्र लिहिले. 'गेले दहा दिवस ईडीचे अधिकारी आपली चौकशी करत आहेत. रोज आठ ते दहा तास त्यांनी चौकशी केली. ईडीला जे अपेक्षित आहे त्यासंदर्भात आपल्याकडे आता सांगण्यासारखे काही उरले नाही,' असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

 असा झाला युक्तिवाद

देशमुख यांच्या वतीने त्यांचे वकील विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली.सचिन वाझे प्रकरणात देशमुख यांची महत्वाची भूमिका असल्याचे ईडी म्हणत आहे. मात्र ईडीने वाझेला या प्रकरणात एकदाही अटक करून कोठडी मिळवलेली नाही. देशमुख यांच्या मतदारसंघातील एका व्यक्तीसमोर बसवून त्यांची चौकशी करायची आहे असे ईडीचे म्हणणे आहे. वाझेला न्यायालयीन कोठडीत असतानाही चौकशीसाठी बोलवले जाऊ शकत असेल तर देशमुख यांना का बोलवले जाऊ शकत नाही? त्यांची कोठडी का वाढवून मागितली जात आहे, असा युक्तिवाद अॅड. चौधरी यांनी केला.

वाझे आणि देशमुख यांची समारोसमोर चौकशी करायची आहे असे ईडीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र अॅड. चौधरी यांनी त्याला आक्षेप घेतला. वाझेची कोठडी घेतल्यानंतर तशी चौकशी करता येऊ शकते. गरज पडल्यास त्यावेळी देशमुखांची कोठडीही न्यायालयाच्या परवानगीने घेता येऊ शकते. वाझे सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याची कोठडी वाढवली गेली तर, असे अॅड. चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले.

तुम्हाला छळले का ?

जबाब नोंदवायचा असल्याने आणखी कोठडी वाढवण्यात यावी अशी विनंती ईडीकडून करण्यात आली. चौकशीदरम्यान ईडीकडून छळ झाला का? अशा न्यायालयाच्या सवालावर देशमुख यांनी नकारार्थी उत्तर दिले. अनिल देशमुख आणि ईडीच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने देशमुख यांच्या कोठडीत 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली.

Post a Comment

Previous Post Next Post