राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षा घेण्यासाठी तयारी सुरू.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शैक्षणिक वर्ष 2022 मधील दहावी-बारावीची लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षा घेण्यासाठी तयारी केली जात असून लवकरच या विषयी धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.दहावी-बारावीची लेखी परीक्षा घेण्यासाठी नुकतीच शालेय शिक्षण विभागाने चाचपणी केली होती. तसेच विविध शिक्षक, मुख्याध्यापक संघटना, पालक संघटना, राज्य शिक्षण मंडळातील अधिकाऱयांची बैठकही पार पडली होती. यात पालक-विद्यार्थ्यांसह विविध तज्ञांनी ऑफलाइन परीक्षा घेण्यासाठी संमती दर्शवली होती. त्यानंतर मंडळाकडून मागील काही दिवसांत परीक्षेच्या आयोजना संदर्भात अनेक बैठका पार पडल्या आहेत.
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र आता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले जात असून त्यासाठी मंडळाने आपल्या नऊ विभागीय मंडळांतून तयारीची माहितीही गोळा करण्यास सुरुवात केली आहे.