स्वातंत्र्याचा अन्वयार्थ जपणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य





प्रेस मीडिया वृत्तसेवा :

कुरुंदवाड ता.२६, हजारो वर्षांची प्राचीन संस्कृती असलेला आपला भारत शतकानुशतके परकीय आक्रमकांच्या ताब्यात होता.त्यानंतर दीडशे वर्षे ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी इथे सत्ता प्रस्थापित केली. या शोषण करणाऱ्या सत्तेला घालवून देण्यासाठी १८५७ ते १९४८ असा नव्वद वर्षे भारतीय जनतेने संघर्ष केला.हजारो वीरांच्या बलिदानातून, तुरुंगवासातूनआणि लाखोंच्या सहभागाने आपला देश स्वतंत्र झाला आहे. हजारो वर्षाची भारतीय संस्कृती, प्रदीर्घ चाललेला स्वातंत्र्यलढा यांनी रुजविलेल्या मूल्यातून स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार झाली. हा सर्व क्रम लक्षात घेऊन त्याआधारे हा देश अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी झटणे हाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अन्वयार्थ आहे.तसेच तशी निष्ठापूर्वक वाटचाल करणे ही आपली राष्ट्रीय जबाबदारी व कर्तव्य आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते शतकोत्तर नगरवाचनालय, कुरुंदवाडच्या वतीने आयोजित पद्मश्री पा.वा. गाडगीळ आणि डॉ.स.रा.गाडगीळ स्मृती शरद व्याख्यानमालेत " स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव " या विषयावर बोलत होते. कार्याध्यक्ष अ.शा. यांनी प्रास्ताविक केले. उपकार्याध्यक्ष प्रा.बी.डी. सावगावे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.


प्रसाद कुलकर्णी म्हणले,जाती-अंता ऐवजी जातीबद्धता, संसदीय लोकशाही ऐवजी एकचालकानूवर्तीत्वाची हुकूमशाही, धर्मनिरपेक्षते ऐवजी वाढती धर्मांधता व परधर्म द्वेष ,संघराज्यीय एकात्मतेचे ऐवजी 

 फुटीरतावाद ,समाजवादा ऐवजी माफिया भांडवलशाही, सामाजिक न्याया ऐवजी अन्याय अशी जर भारताची वाटचाल होत असेल तर ती स्वातंत्र्याच्या आशयाशी प्रतारणा आहे. या पार्श्वभूमीवर असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी जो अतुलनीय त्याग केला, धैर्य दाखवले आणि अविश्रांत कष्ट केले त्याचा आदर्श आपण जपायला व जोपासायला हवा. तो नव्या पिढीपुढे ठेवायला हवा.चंगळवाद ,भोगवाद ,परावलंबित्व, पराकोटीची विषमता हे सर्व बदलायचं असेल तर जुन्या आदर्शांचा इतिहास सातत्याने मांडला पाहिजे. त्यापासून बोध घेतला पाहिजे. प्रत्येकाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करणे आणि ते स्वातंत्र्य मिळवून उपभोगणे क्रांती दिनाच्या आणि स्वातंत्र्य दिनाचा आशय आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये आपण तो जोपासला पाहिजे.प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात या विषयाच्या अनेक बाजू स्पष्ट केल्या.सच्चीदानंद आवटी यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post