विधानपरिषद निवडणुक : बहुतांश मतदार सहकुटुंब सहलीवर जाणार

मतदारांचे समाधान करता करता आता नेत्यांचे समाधानही करण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी नेतेमंडळींनी पायाला भिंगरी बांधली असून उमेदवारांसह पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भेटीगाठीवर भर दिला जात आहे.तळ्यात-मळ्यात मतदारांवर दोन्हीकडून पाळत ठेवली जात आहे. दरम्यान, विविध जोरदार प्रलोभने दाखवून सहलीवर पाठवण्याचे नियोजन सुरू झाले असून सुरक्षित ठिकाणीच सहलींचे नियोजन केले जाणार आहे. चार दिवसात बहुतांश मतदार सहकुटुंब सहलीवर जाणार आहेत.


विधान परिषद निवडणुकीत विकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील तर विरोधी भाजप आघाडीकडून माजी आमदार अमल महाडिक यांच्यात काटाजोड लढत होत आहे. दोन दिवसांपासून विधान परिषदेचे रणांगण चांगलेच तापू लागले असून प्रत्येक मतासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली जात आहे. मतदारांचे समाधान करता करता आता नेत्यांचे समाधानही करण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.

अनेक मतदार दोन्ही उमेदवारांना आम्ही तुम्हालाच मतदान करणार असल्याचे सांगत भाव वाढवत आहेत. त्यामुळेच उचल घेऊन देखील सहलीवर जाण्यास त्यांची टाळाटाळ सुरू आहे. जो पर्यंत सदस्य सहलीवर जात नाहीत तो पर्यंत निवडणुकीचा कल समजणे कठीण होणार आहे. दोन्ही आघाड्यांकडून सध्या मतदारांना जोरदार प्रलोभने दाखवली जात असून प्रत्यक्ष मतदानापर्यंत मतासाठीचा 'आकडा' आणखी वधारणार असल्याचे सध्या चित्र आहे. सध्या पहिली उचल किमान दोन ते पाच लाखांपर्यंत गेली असल्याची चर्चा आहे.






जगदीश अंगडी : कार्यकारी संपादक :


जाहिरात बातम्यांसाठी संपर्क :+919960646084

Post a Comment

Previous Post Next Post