... त्यामुळे पाच, दहा खोकी नाकारणाऱ्या या पदाधिकाऱ्याच्या फजितीची चर्चा चांगलीच रंगली
प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनिधी :
विधानपरिषद निवडणूक...तुल्यबळ उमेदवारांमुळे विधान परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाल्यामुळे मतदारांच्या अपेक्षाही वाढल्या.नेत्यांच्या जीवावर पदे भोगूनही निवडणुकीत खोक्याची सवय लागलेल्या काही मतदारांचे तऱ्हेवाईक किस्से आता बाहेर पडू लागले आहेत. त्यातील काही...
घेतली तर फक्त २० खोकीच....
विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली असली तरी त्यातील अनेक किस्से मात्र पुढे येत आहेत. अनेक आश्चर्यकारक गोष्टी पडद्यामागे घडल्या असून पुढे काही दिवस याचीच चर्चा रंगणार आहे. अशाच एका उचलीची चर्चा सध्या सुरू झाली आहे. एका माजी पदाधिकाऱ्याला सर्वांप्रमाणेच पाच खोक्यांची उचल दिली. मात्र घेतली तर २० खोकी अन्यथा नको, असा पवित्रा त्यांनी घेतला. दरम्यान अर्ज माघारीच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी माघार घेतली आणि अचानकच निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे पाच, दहा खोकी नाकारणाऱ्या या पदाधिकाऱ्याच्या फजितीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
मागील निवडणुकी प्रमाणेच यावेळच्या निवडणुकीतही रिवाजाप्रमाणे टोकन वाटप केले. एका माजी पदाधिकाऱ्याकडे टोकन वितरण करणारी मंडळी पोहेाचली. टोकनची रक्कम ऐकूनच ऑफर धुडकावली. संबंधित उमेदवार आपले जवळचे नातेवाईक असल्याने आपणाला टोकनची गरज नसल्याचे सांगत समोरच्यावर 'पावशर' मारण्यास ही व्यक्ती विसरली नाही. त्यामुळे गुपचूप १० खोक्यांची ऑफर दिली. ती देखील फेटाळून लावत २२ खोक्यांची मागणी केली. त्यामुळे टोकन वाटणाऱ्यांना दिवसा घाम फुटायची वेळ आली. अखेर उमेदवारांनीच अर्ज माघारीनंतर मतदारावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. अर्ज माघारी दिवशी विरोधकांनीच माघार घेतली, अन अचानकच निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे या २२ खोकीवाल्याची अवस्था मात्र हा ही गेले.... अशी झाली.
खोकं एवढंच कसं...?
एका मोठ्या पदावर राहिलेल्या रांगड्या मतदाराने तर कहरच केला. उमेदवार असलेल्या नेत्याने त्यांना लाल दिव्यापर्यंत पोहोचवले; मात्र रांगडे, रांगडे म्हणत त्यांनी अनेकांना 'रांगायला' लावले. निधी वाटपात असा काही पराक्रम केला की अधिकाऱ्यांच्या 'नोकऱ्या' जाण्याची वेळ आली. या सर्व प्रकरणातून नेत्यांनी त्यांना सहिसलामत बाहेर काढले. या सर्वाबद्दल कृतज्ञता बाळगायची सोडून विधान परिषद निवडणुकीत पहिली उचल करायला, या रांगड्या गड्याने मागे पुढे पाहिले नाही. सर्वांबरोबर पहिली उचल घेतानाच कारभाऱ्यांना एवढेच काय असे विचारून चकित केले. आता निवडणूकच बिनविरोध झाल्याने या रांगड्या गड्याच्या पराक्रमाचा योग्य तो सन्मान करण्याचा निर्णय कारभाऱ्यांनी घेतला आहे.