कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठीचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा मुंबईत राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला

 आता नव्याने त्रिसदस्य पद्धतीने निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे : 

 कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर सोमवारी मध्यरात्री तयार झाला . मंगळवारी दुपारी मुंबईत राज्य निवडणूक आयोगाला आराखडा सादर करण्यात आला.शहरात एकूण 31 प्रभाग असणार आहेत. यात त्रिसदस्यीय प्रभाग 30 व 2 नगरसेवकांचा 1 अशा 31 प्रभागांचा समावेश आहे. आयोगाकडून आराखडा तपासून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी तारीख कळविण्यात येईल. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होईल.

त्रिसदस्य प्रभाग रचनेमुळे यापूर्वीच्या सर्वच प्रभागांच्या हद्दी बदलल्या आहेत. भौगोलिक संलग्नता व ब्लॉकनुसार सर्वच प्रभागांची फेररचना केली आहे. महापालिकेचे नवे सभागृह 92 नगरसेवकांचे होणार आहे. सुमारे 17 हजार 910 लोकसंख्येचा एक प्रभाग असेल. साधारणतः एप्रिलमध्ये निवडणुकीची रणधुमाळी माजेल.

निवडणूक आयोगाने महापालिकेला प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. गेले काही दिवस प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर व संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अधिकारी सुधाकर चल्लावाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात प्रभाग रचना तयार करण्यात मग्न होते. अधिकार्‍यांनी आराखडा तयार करण्यासाठी अक्षरशः रात्रंदिवस प्रयत्न केले.

त्रिसदस्य प्रभाग रचनेची अंमलबजावणी होत असल्याने कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी डॉ. बलकवडे प्रयत्नशील होत्या. त्यांनी सूक्ष्म नियोजन केले जात होते. त्यामुळेच 18 नोव्हेंबर ही डेडलाईन असूनही त्या कालावधीत प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले नाही. अखेर 24 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली होती. सोमवारी रात्री दीडच्या सुमारास प्रभाग रचना पूर्ण होऊन त्यावर प्रशासक डॉ. बलकवडे यांची स्वाक्षरी झाली. उपायुक्त आडसूळ व सहायक आयुक्त औंधकर यांनी मुंबईत आराखडा सादर केला.

महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. कोरोनामुळे निवडणूक होऊ शकली नाही. आयुक्त डॉ. बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर 2020 मध्ये निवडणूक आयोगाने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एकसदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली होती.

त्यावर शिक्कामोर्तब होऊन आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी सूचना व हरकती माग?विण्यात आल्या होत्या. त्यावर सुमारे दोन हजारांवर हरकती दाखल झाल्या होत्या. तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्व प्रक्रिया थांबविण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत राज्य सरकारने त्रिसदस्य प्रभाग रचनेचे आदेश दिले. त्यानुसार आता नव्याने त्रिसदस्य पद्धतीने निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post