कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी

न्यायालयीन निर्णयानंतर आज पासून प्रत्यक्षात सुरू झाली.

 प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अखेर न्यायालयीन निर्णयानंतर आज पासून प्रत्यक्षात सुरू झाली.अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी दिग्गजांनी शक्तिप्रदर्शन करून आपआपले अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे आज दिवसभरात 19 उमेदवारांचे 33 अर्ज दाखल झाले आहेत.


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या सहकारी बँक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असताना, काही संस्था न्यायालयात गेल्याने जिल्हा बँकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. नुकत्याच सांगली, सातारा जिल्हा बँकांच्या निवडणुका पार पडल्या. पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया जेथून थांबली, तेथून पुढे सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

राष्ट्रवादीची सत्ता व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेच्या 12 तालुक्यांतील विकास संस्था गटातून 12, तर इतर गटांतून 9 अशा एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 3 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर, 5 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार असून, 7 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

सोमवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी कागल तालुका सेवा संस्था गटातून हसन मुश्रीफ यांनी, तर कृषी-पणन गटातून खासदार संजय मंडलिक यांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावडा सेवा सोसायटीतून अर्ज दाखल केला. यावेळी 66पैकी 49 सभासद फेटा बांधून उपस्थित होते. पाठोपाठ आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही समर्थक व मतदार सभासदांसह वाजतगाजत शिरोळ तालुका सेवा गटातून आपलाही अर्ज दाखल केला.

याशिवाय भुदरगडमधून माजी आमदार के. पी. पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह पाटील यांनी प्रत्येकी चार, गडहिंग्लजमधून संतोष पाटील, हातकणंगलेमधून शिरीष देसाई, पन्हाळा तालुक्यातून आमदार विनय कोरे, शाहूवाडीमधून सर्जेराव पाटील, तर महिला गटात माजी खासदार निवेदिता माने, रेखा कुराडे आणि उदयानी साळुंखे यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कृषी, पणनमधून बाबासाहेब पाटील (2), नागरी बँक/पतसंस्था/पगारदार पतसंस्था गटातून विलास पाटील, अशोक पवार यांचे प्रत्येकी एक आणि इतर मागासवर्गीय गटातून आदिल फरास (1) व विलास गाताडे (2) असे दिवसभरात एकूण 19 उमेदवारांनी 33 अर्ज दाखल केले आहेत.

अर्थवाहिनी मजबूत करण्यासाठी राजकारणविरहित काम - हसन मुश्रीफ

'गेली अनेक वर्षे कागल तालुक्याने जिल्हा बँकेचे नेतृत्व केले आहे. बँकेत सत्ता असल्याने भरभक्कम मतांची बेरीज हीच आमची ताकद आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी सव्वा लाखाचे कर्जवाटप केल्याने जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम राहील,' असा विश्वास बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे बँका अडचणीत सापडल्या. जिल्हा बँकेचे पावणेतीन कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने न स्वीकारल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. यावरही जिल्हा बँकेने मात करून हा तोटाही भरून काढल्याचे मुश्रीफ म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post