महादेवराव महाडिक यांनी थेट जयसिंगपूर गाठून राज्यमंत्री यड्रावकर यांची भेट घेतली.
यड्रावकर यांची या निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार...
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
जगदीश अंगडी (कार्यकारी संपादक) :
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कोल्हापूर विधान परिषदेसाठी शौमिका महाडिक यांचे नाव निश्चित झाल्यानंतर त्यांचे सासरे तथा माजी आमदार महादेवराव महाडिक सक्रीय झाले आहेत.त्यांनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी आज (ता. १२ नोव्हेंबर) जयसिंगपूर मध्ये जाऊन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेतली. महाडीक स्वतःच मैदानात उतरल्याने त्यांच्या गटाची यंत्रणाही कामाला लागली आहे. जयसिंगपूर नगरपालिकेत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे स्वीकृत्तसह एकूण १८ नगरसेवक आहेत. या नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षांसह १२ नगरसेवक आहेत, त्यामुळे यड्रावकर यांची या निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर महाडीक यांनी नेहमीप्रमाणे काल (शुक्रवारी) सायंकाळी चारनंतर कसबा बावडा येथील राजाराम कारखान्यात न येता थेट जयसिंगपूर गाठून राज्यमंत्री यड्रावकर यांची भेट घेतली
कोल्हापूर विधान परिषदेच्या या निवडणुकीत महादेवराव महाडीक यांच्या स्नूषा सौ. शौमिका याच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी स्वतः माजी आमदार महाडीक हेच मैदानात उतरले आहेत. तत्पूर्वी माजी खासदार धनंजय महाडीक यांचे पुत्र पृथ्वीराज महाडिक यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने जयसिंगपूर आणि शिरोळ येथील नगरसेवकांची भेट घेतली आहे. शौमिका महाडिक यांच्या नावाची भाजपकडून आज ता. १३ नोव्हेंबर घोषणा झाल्यानंतर ही यंत्रणा अधिक सक्रिय होणार आहे, हे मात्र निश्चित.