प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर ता.२९, ' गझलसाद ' कोल्हापूर संस्थेच्या वतीने ज्येष्ठ गझलकारा डॉ.संजीवनी तोफखाने यांच्या ' गझल संजीवनी ' या गझल मैफलीचे आयोजन केले होते. थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी झालेल्या या मैफलीत सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. गझलसादचे निमंत्रक प्रा.नरहर कुलकर्णी यांनी स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले व त्यातून गझलसादची वाटचाल व उपक्रम अधोरेखित केले.त्यानंतर डॉ. संजीवनी तोफखाने यांनी आपल्या विविध रंगाच्या व ढंगाच्या आशयसंपन्न गझला सादर केल्या. सव्वा तास चाललेल्या या मैफलीत रसिकांना उत्तमोत्तम गझलांचा आस्वाद दिला.
स्त्रीला बरंच काही पेलावं आणि झेलावंही लागतं.हे सार्वकालिक सत्य गझलेतून मांडताना डॉ.संजीवनी तोफखाने म्हणाल्या, 'तू घाव घातलेला पदरात झेलला मी,जो शब्द टाकला तू हृदयात झेलला मी,वर्चस्व पौरुषाचे दावीत राहिला तो, त्याचाच अंश माझ्या उदरात झेलला मी '...हे सगळं झेलत झेलत जीवनातील हळवे -आनंददायी क्षण केवळ हृदयपटावरच नव्हे तर रोजनिशीच्या पानावर लिहिते असे सांगताना त्या म्हणाल्या 'मोरपिसासह स्मॄतिस जपले रोजनिशीच्या त्या पानावर,अन् सौख्याचे क्षण टपटपले रोजनिशीच्या त्या पानावर'.
माणूस निसर्गाची राखण करण्याऐवजी त्याला ओरबडतो,प्रदूषित करतो हे सांगताना त्या म्हणाल्या 'प्रदुषित का नदीस करशील अरे मनुष्या,वाहे बघ हे निर्मळ पाणी तुझ्याचसाठी'.स्त्री सर्वार्थाने सक्षम असते पण पुरुषप्रधान व्यवस्था हे सहजपणे मान्य करत नाही.अशावेळी आपली पायवाट आपणच तयार करावी लागते हे सांगताना संजीवनीताई म्हणाल्या, 'माझ्याच पावलांची मी पायवाट झाले,आखीव जीवनाचा रेखीव घाट झाले,संसार थाटलेला दोघे मिळून आम्ही,चौरंग तो पुजेचा मी मात्र पाट झाले.…
आजच्या समाजव्यवस्थेत पैसा, नेता,कार्यकर्ता यांना आलेले बाजारी व विकृत स्वरूप पाहून त्यावर त्यांची लेखणी गझलांमधून नेमके बोट ठेवते.त्या म्हणाल्या , 'माणसास या भुरळ घालतो चमचमाट पैशाचा,नाचण्यास त्या भाग पाडतो छनछनाट पैशाचा...कामधंदा सोडुनी तो फिरत होता मागुती,
'तळमळीचा कार्यकर्ता' शब्द की बोकाळला...वंदीत एकमेका निंदीत एकमेका,गाणी जुनी नव्याने गातात लोकनेते,टाळ्यात बंद सारे, तोट्यात सर्व धंदे,तेजीत एक धंदा, लाभात लोकनेते...
' काट्यांना मी नाहीच बधले कधी आजवर,पायाखाली माळीत गेले फुलासारखे.'....आणि 'आघाडीवर कैक लढावे लागे तिजला,नारीला मी वीर म्हणाले चुकले का रे '..असे म्हणणाऱ्या डॉ.संजीवनी तोफखाने यांनी आपल्या गझलेतून पांडुरंग,श्रीकृष्ण,श्रद्धा,पुराणकथा,पर्यावरण, प्रदूषण,स्त्री वेदना,सामाजिकघडामोडी,राजकारण,व्यसनाधीनता,
शेतीसंस्कृती अशा विविध विषयांवरील आशयघन रचना सादर केल्या. आणि'वेदनेचा साज आहे गझलेस माझ्या,सागराची गाज आहे गझलेस माझ्या'..'भावनांना भाळते माझी गझलआसवांना माळते माझी गझल ' असे म्हणत आपले गझलेशी असलेले नाते स्पष्ट केले. नागेशकर सभागृहात झालेल्या या मैफलीला प्रा.नरहर कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, डॉ.दिलीप कुलकर्णी, सुभाष नागेशकर,प्रवीण पुजारी,निनाद खाडिलकर, कृपेश हिरेमठ,जवाहर अकणे,संजय शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच ही मैफल गझलसादच्या फेसबुक पेजवरूनही प्रसारित केली.