अनेक दिवस सामसूम झालेले स्थानक आज पुन्हा प्रवाशांच्या कलकलाटाने गजबजून गेले.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
खेड : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर खेड आगारातील काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने खेड स्थानकातून पहिली एसटी चिपळूणकडे रवाना झाली. तब्ब्ल 19 दिवसानंतर खेड स्थानकाच्या फलाटावर एसटी आल्याने स्थानकावर एसटीची वाट पाहणारे प्रवासी आनंदित झाले.19 दिवसांनी खेड स्थानकाहून पहिली एसटी सुटल्याने गेले अनेक दिवस सामसूम झालेले स्थानक आज पुन्हा प्रवाशांच्या कलकलाटाने गजबजून गेले.
एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसह अन्य काही प्रलंबित पाहण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. गेले 19 दिवस हा संप सुरू होता. त्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लाल परीच्या चाकांना ब्रेक लागला होता. ग्रामीण भागातून शहरात येणारे ग्रामस्थ तसेच विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. एसटी बंद असल्याचा फायदा उठवत खासगी प्रवाशी वाहतूकदार ताईच रिक्षा व्यवसायिक यांनी प्रवाशांची अक्षरशः लूट करायला सुरुवात केली होती.
कर्मचाऱ्यांचा संपामुळे एसटी महामंडळाचेही प्रतिदिन लाखो रुपयांचे नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची वारंवार विनंती केली होते. परिवहन मंत्री ऍड अनिल परब यांनी कर्मचाऱ्याना भावनिक आवाहन करून कामावर रुजू होण्याची हाक दिली होती. तसंच, दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री ऍड अनिल परब यांनी एसटी कामगारांच्या वेतनात घसघशीत वाढ केल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर काही कामगार कामावर रुजू होऊ लागले.
खेड आगारातील काही कामगार देखील कामावर हजर झाल्याने आज तब्ब्ल 19 दिवसानंतर खेड चिपळूण हे पहिली एसटी बस खेड स्थानकावर चिपळूणकडे रवाना झाली जसजसे कमर्चारी कामावर हजर होतील तसतशा खेड स्थानकातून बसेस सुरु केल्या जातील, अशी माहिती स्थानक प्रमुखांनी माध्यमांशी बोलताना दिली. शुक्रवारपासून खेड स्थानकातून काही बस मार्गस्थ होऊ लागल्या असल्याने गेले काही दिवस शुकशुकाट असलेल्या खेड स्थानकावर पुनः गजबजाट सुरू झाला आहे.